माजी विद्यार्थ्याकडून प्राध्यापिकेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:52 AM2019-01-23T00:52:02+5:302019-01-23T00:52:16+5:30
शहरातील एका महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्याने विवाहिता प्राध्यापकाच्या कपाळावर बळजबरीने कुंकू लावत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे.
नाशिक : शहरातील एका महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्याने विवाहिता प्राध्यापकाच्या कपाळावर बळजबरीने कुंकू लावत विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित विवाहिता प्राध्यापक गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयात नियमितपणे प्रयोगशाळेत कर्तव्य बजावत असताना सोमवारी (दि.२१) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास संशयित योगेश रमेश जावळे (२९, रा. चव्हाणके टॉवर, मखमलाबाद नाका) याने पीडित विवाहितेसोबत फोनवर संपर्क साधत व प्रत्यक्ष भेटून लग्नाची मागणी घातली. विवाहितेने नकार दिल्याचा राग येऊन जावळे याने थेट प्रयोगशाळेत विवाहितेचा हात धरला ‘तू माझ्यासोबत लग्न कर’ असे सांगून खिशातून कुंकवाची पुडी काढत कपाळावर कुंकू लावण्याचा प्रयत्न केला; मात्र विवाहितेने त्याच्या हाताला जोरदार हिसका दिल्याने कुंकू जमिनीवर पसरला. यावेळी झालेल्या आरडाओरडीचा व साहित्य पडण्याच्या आवाजाने पीडितेला सोडविण्यासाठी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. दरम्यान, संशयित जावळे याने कर्मचाºयांना धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्न केल्याचे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरून सरकारवाडा पोलिसांनी संशयित जावळेविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, त्यास अटक करण्यात आली आहे.
काही तासांत अटक
पोलिसांनी मंगळवारी (दि.२२) संध्याकाळी योगेश जावळे यास अवघ्या काही तासांत अटक करून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, घडलेला प्रकार अत्यंत निंदणीय असल्याची संतप्त भावना शिक्षकवर्गातून उमटल्या.