पिंपळगाव हायस्कूलमध्ये रमले माजी विद्यार्थी
By Admin | Published: October 18, 2014 12:02 AM2014-10-18T00:02:41+5:302014-10-18T00:05:02+5:30
पिंपळगाव हायस्कूलमध्ये रमले माजी विद्यार्थी
पिंपळगाव : येथील हायस्कूलमध्ये सन १९८५ ते १९९१ या कालावधीत पाचवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. यावेळी २० ते २५ वर्षापूर्वीच्या आठवणीला उजाळा देण्यात आला. रविवार सुट्टी असूनही सकाळी शाळेची घंटा वाजली कारण शाळेलाही प्रतीक्षा होती, ती २५ वर्षानंतर आलेले सर्व विद्यार्थ्यांची. तोच वर्ग प्रत्येकाच्या लक्षात राहिलेल्या तेच बेंच तेच क्लास टीचर. दहा वाजता शिक्षकांचे त्याच तोऱ्यात आगमन झाले, आणि सर्व विद्यार्थी गुड अफ्टरनून सर म्हणाले, सरांनी बसण्याचा आदेश दिला. तसेच हजेरी सुरूकेली. भूषण पुस्तके, अनिल शिंदे त्यातच सोमनाथ शिंदे उशिराने आला आणि शिक्षकांनी थांब थोडा हजेरी झाल्यावर वर्गामध्ये ये, असे सांगितले आणि प्रचंड हशा उसळला. सोमनाथ शिंदे यांनी २४ वर्षापूर्वींचाच संवाद मारून कपडे वाळले नव्हते सर म्हणून उशीर झाला असे सांगितले. पुन्हा प्रचंड हसा उसळला, सर्व मुलांची हजेरी झाली. ६६ विद्यार्थीपैकी ५५ विद्यार्थी हजर होते. १०अच्या वर्गात बसल्याने सर्व विद्यार्थी वयाचे भान विसरून गेले आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्यानंतर स्नेहसंमेलनला सुरुवात झाली. स्नेहसंमेलनात अभिजीत तुपे, सुधाकर कापडी, सुहास शिंदे, संदीप पाटील, अमोल कावळे आदिंनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. काळाच्या प्रवाहात दहावीची परिक्षा झाली. गुणवत्तेचे पंख घेऊन प्रत्येकजण आपल्या इच्छेने आपले अवकाश शोधण्यासाठी पाखरांच्या थव्याप्रमाणे उडून गेले. आज २ तप झाली म्हणजे २४ वर्षे उलटून गेली, पण पाखर कधी शाळा विसरली नाही त्याच ओढीने आज पुन्हा झाडांच्या फांद्यावर येऊन बसली. सर्व विद्यार्थी मित्र म्हणून एकत्र आले. (वार्ताहर)