विद्रोही साहित्य संमेलनासाठी मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:14 AM2021-02-07T04:14:52+5:302021-02-07T04:14:52+5:30
नाशिक : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा आणि आयोजकांचा नेहमीचा व्यवहार कायमच विषमतावादी राहिल्याचा दावा करीत नाशकात लवकरच ...
नाशिक : अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा आणि आयोजकांचा नेहमीचा व्यवहार कायमच विषमतावादी राहिल्याचा दावा करीत नाशकात लवकरच विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी मोर्चेबांधणी सुरु झाले आहे. त्यामुळे विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्याच्या दृष्टीने विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने रविवारी (दि ७) नाशकात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
भांडवली-पुरुषसत्ताक मूल्य संस्कृतीच्या विरोधात विद्रोही सांस्कृतिक चळवळ १९९९ पासून महाराष्ट्रभर कार्यरत आहे. या समितीच्यावतीने हुतात्मा स्मारक येथे दु. ३ वाजता आयोजन करण्यात आले आहे. भांडवली,पुरुषसत्ताक, मूल्य-संस्कृती-विचारांचा विषारी प्रचार-प्रसार करणाऱ्या या संमेलनांच्या विरोधात भूमिका घेण्याचा संदेश मानून आपण विचार व संघटित कृती केली पाहिजे, असे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या निमित्ताने शरद शेजवळ, नानासाहेब पटाईत, अर्जुन बागुल, यांनी कळविले आहे . म्हणून त्या संमेलनावर बहिष्कार टाकत सामान्य जनतेच्या बाजूने उभे रहाणे हीच एकमेव लोकशाहीवादी, खरी समतावादी, नैतिक,स्वाभिमानी कृती आहे. यासाठीच विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन-संयोजन व त्यातील सहभाग अगत्याचा आहे. विद्रोही साहित्य संमेलन घेण्यासंदर्भात आपण मार्गदर्शन, सहकार्य, आर्थिक मदत, संघटनात्मक सहभाग यासंदर्भात आपल्या सूचना, मते, विचार व मार्गदर्शन करण्यासाठी ही बैठक होणार आहे.