दहावीच्या निकालासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे सूत्र स्वागतार्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:11 AM2021-05-31T04:11:57+5:302021-05-31T04:11:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : दहावीच्या निकालासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेल्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : दहावीच्या निकालासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेल्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्राची रुतलेले चक्रे पुन्हा फिरणार असल्याने विद्यार्थी व पालकांसह शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांनाही मोठा दिलासा मिळाला असून, दहावीच्या निकालासाठी निश्चित करण्यात आलेल्या अंतर्गत मूल्यामापनाच्या सूत्राचे शैक्षणिक वर्तुळातून स्वागत होत आहे.
कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कशा पद्धतीने जाहीर होणार, याकडे लाखो विद्यार्थी व पालकांसह शिक्षक आणि संस्थाचालकांचेही लक्ष लागले होते. त्यामुळे शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे विद्यार्थी, पालक व शिक्षकांसह मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांनीही स्वागत केले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची पद्धत निश्चित झाल्याने आता लवकरात लवकर निकाल तयार करून तो जाहीर केल्यास विद्यार्थ्यांचा अकरावी प्रवेशाचा मार्ग सुकर होऊ शकेल, अशी अपेक्षाही विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
कोट-
विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होणे आवश्यकच होते. त्यांना भविष्यात या गुणपत्रिकांची गरज भासणारच आहे. परंतु, नव्या पद्धतीनुसार दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करताना शिक्षकांना अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. मूल्यमापनाची पद्धती सोपी करायला हवी होती. मूल्यमापनासाठी शिक्षकांना शाळेत येऊन जास्त वेळ काम करावे लागेल.
- राजेंद्र निकम, कार्यवाह, नाशिक एज्युकेशन सोसायटी
कोट-
कोरोनाचे संकट लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक दडपण कमी करणारा चांगला निर्णय घेतला असून, शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे. विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण करण्यापेक्षा अशा प्रकारे मूल्यमापन करून विद्यार्थ्यांचा निकाल तयार करणे योग्यच आहे. अनेक विद्यार्थी दहावीचे पहिले सत्रही ऑनलाईन अथवा ऑफलाईन शिक्षण घेऊ शकले नाही, अशा विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मूल्यमापन करणे आवश्यक आहे; परंतु त्यासाठी शिक्षकांवरचा कामाचा ताण वाढणार असून, त्यासाठी अपेक्षापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.
- गुलाबराव भामरे, मुख्याध्यापक, मराठा हायस्कूल
कोट-
दहावीच्या निकालासंदर्भात शासन निर्णयाचे माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने स्वागत आहे. शासनाने नववीच्या ५० टक्के गुणांचा विचार करून दहावीचा निकाल तयार करण्याचा विचार केल्याने ही बाब विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची व वास्तववादी आहे. मात्र, दहावीच्या निकालानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी काठीण्य पातळी तपासणे अडचणीचे होणार आहे. त्यासाठी संपूर्ण राज्यस्तरावर समान नियमांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
- मोहन चकोर, अध्यक्ष, नाशिक शहर माध्यमिक शिक्षक संघ
---
इन्फो -
शंभर गुणांच्या मूल्यमापनाचे सूत्र असे
-नववीच्या विषयनिहाय अंतिम निकालातील ५० टक्के गुण
-दहावीच्या वर्षातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे ३० टक्के गुण
- दहावीचे अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन २० टक्के गुण
जिल्ह्यातील दहावीचे विद्यार्थी
मुले - ५२,८०३
मुली -४६,१४६
एकूण- ९८,९५९