दुर्गप्रेमींची हरिहर किल्ल्यावर स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 10:16 PM2021-02-18T22:16:47+5:302021-02-19T01:47:44+5:30
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरीच्या रांगेत असलेल्या देवगाव परिसरातील हरिहर किल्ल्याची शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती या संस्थेने स्वच्छता मोहीम ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरीच्या रांगेत असलेल्या देवगाव परिसरातील हरिहर किल्ल्याची शिवदुर्ग संवर्धन व भ्रमंती या संस्थेने स्वच्छता मोहीम केली.
देवगावपासून १० किमी अंतरावर आणि ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस समुद्रसपाटीपासून ११२० मीटर उंचीचा त्रिकोणी आकार असलेला हरिहर किल्ला आहे. चढाईसाठी कठीण असलेल्या हर्ष किल्ल्याच्या पायऱ्या थेट कातळात कोरलेल्या आहेत. गिरीदुर्ग प्रकारात मोडलेल्या या किल्ल्याचा पायऱ्यांचे खास वैशिष्ट्य आहे.
प्रथमत: किल्ल्यावरील सर्व चॉकलेट, बिस्कीट, वेफर्स व कुरकुरे यांचे रॅपर तसेच रिकाम्या पाण्याच्या बाटल्या एकत्र जमा करण्यात आल्या. दुपारी जेवणानंतर किल्ल्यावरील पाण्याच्या तलावाच्या कडेला अस्ताव्यस्त पडलेले मोठे दगडं तलावातून काढून तलाव स्वच्छ करण्यात आला. विशेष म्हणजे, तलावातील गाळ व दगडं काढण्यासाठी संस्थेच्या सभासदांची एक साखळी तयार करून पाण्यातून बाहेर काढण्यात आले. स्वछता मोहिमेच्या कार्यात महिला तसेच लहान मुलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, हे कार्य करत असताना मनस्वी आनंद झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
मोहिमेमध्ये श्याम गव्हाणे,सोमनाथ गव्हाणे,विजय दराने,विजय महाले,बाळासाहेब शिंदे,लखन पाळदे,वैशाली गव्हाणे,आर्यन गव्हाणे,कृष्णा गव्हाणे,सई गव्हाणे,साक्षी गव्हाणे,मदन मुठाळ,रवी राव,राम दाते,सागर पाटील,पूजा शिंदे,कोमल शिंदे,अपूर्वा शिंदे,कविता गव्हाणे आदींनी सहभाग नोंदविला. तसेच शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे पालघर शाखेचे अमित पाटील,चेतन पाटील,धीरज पाटील,कुणाल पाटीलही सहभागी झाले होते.