अॅक्टीव्हा ते फॉर्च्युनर... भावी प्रगतीसाठी शुभेच्छा
By admin | Published: February 23, 2017 12:07 AM2017-02-23T00:07:38+5:302017-02-23T00:07:50+5:30
मिश्किली : म्हणे, मराठी माणसाच्या भल्यासाठी एकत्र
नाशिक : सर्व भावी नगरसेवकांना पुढील पाच वर्षांमध्ये अॅक्टीव्हा ते फॉर्च्युनर या भावी प्रवासासाठी शुभेच्छा... अशा प्रकारचे अनेक मिश्कील संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, निमित्त आहे ते महापालिका निवडणुकीच्या निकालाचे!
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अनेक मिश्कील आणि काही व्यंगात्मक संदेश फिरत होते. त्यातून अनेकांकडून सामान्य नागरिकांच्या भावना व्यक्त होत होत्या. आता मतदान संपल्यानंतरही अनेक संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते... या गझलकार सुरेश भट यांच्या रचनेवर आधारित... इतकेच मला जाताना, पोलिंग बूथवर कळले होते, मतदानाने केली सुटका, प्रचाराने छळले होते... अशी टिप्पणी व्हायरल झाली होती. निवडणुकीच्या आधी दुचाकीवर फिरणारे नंतर मात्र पाच वर्षांत मोठ्या मोटारींमध्ये फिरू लागतात. त्यांच्या या प्रगतीने सर्वसामान्य नागरिकांना आश्चर्य वाटते, त्यावर आधारित एक संदेश फिरत आहे.
भावी नगरसेवकांना पुढील पाच वर्षांमध्ये अॅक्टीव्हा ते फॉर्च्युनर या भावी प्रचारासाठी हार्दिक शुभेच्छा... यातून सर्वसामान्य नागरिकांच्या नगरसेवकांविषयी काय भावना होतात, हेच स्पष्ट होते. निवडणुकीत राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधात आरोप- प्रत्यारोप करणारे आणि एकमेकांची औकात काढणारे पक्ष नंतर मात्र सोयीची भूमिका घेतात. त्यावर आधारितही पोस्ट व्हायरल होत आहेत... उद्या संध्याकाळपासून एक घोषणा ऐकायला येईल, ‘मुंबई आणि मराठी माणसाच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे...’या पोस्ट सर्वसामान्य माणसाच्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या असल्याने त्या अधिक बोलक्या ठरल्या आहेत.