इगतपुरी तालुक्यातील चाळीस गावे पोरकीच
By admin | Published: February 18, 2016 10:59 PM2016-02-18T22:59:55+5:302016-02-18T23:00:37+5:30
नाराजी : सिन्नर विधानसभा मतदारसंघाला जोडल्यानंतर उपेक्षा; रस्त्याची दुरवस्था; पाण्याचे दुर्भिक्ष
सुनील शिंदे घोटी
इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागातील चाळीस गावे सिन्नर विधानसभा मतदारसंघाला जोडल्यानंतर या गावातील जनता मोठ्या अपेक्षेने शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी उभी राहिली होती. परिणामी याच भागातून त्यांना प्रचंड मताधिक्य मिळाल्याने अगदी काट्याच्या लढाईत वाजे विजयी झाले होते. या चाळीस गावातील नागरिकांनी आपणावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे अभिवचनही देण्यात आले होते, परंतु वर्ष उलटूनही या भागाकडे पाठ फिरविल्याने विकासकामांची मागणी कोणाकडे करायची या विवंचनेत या भागातील जनता आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून या चाळीस गावांच्या विकासाबाबत कोणतीही आढावा बैठक झाली नसल्याने ही चाळीस गावे विकासापासून दूर आहेत.
विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसार इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोरपासून आंबेवाडी, टाकेद, कवडधरा असा चाळीस गावांचा भाग सिन्नर मतदारसंघाला जोडण्यात आला. कायम उपेक्षित असणाऱ्या या गावांना सिन्नरला जोडल्याने या गावातील ग्रामस्थांच्या विकासाबाबत अपेक्षा उंचावल्या होत्या आणि मोठ्या अपेक्षेने राजाभाऊ यांच्यावर विश्वास दाखवित मताधिक्य दिले. परंतु या वर्षाचा कार्यकाल संपूनही अद्यापही या भागात लक्षणीय ठरतील अशी कोणतीही विकासकामे न झाल्याने या भागातील जनता नाराज आहे. या भागात असणाऱ्या सर्वतीर्थ टाकेद या धार्मिक क्षेत्राच्या विकासासाठी कोणत्याही उपाययोजना
करण्यात आल्या नसल्याने हे ठिकाण तालुक्यातील इतर धार्मिक ठिकाणच्या तुलनेत उपेक्षित आहे. गेल्या वर्षापासून आमदार वाजे यांनी या भागातील व्यथा, समस्या,
प्रलंबित प्रश्न जाणून घेण्यासाठी या भागात फिरकले नसल्याने, आपली गाऱ्हाणे कोणाकडे मांडायचे असा प्रश्न पडला आहे. तर वर्षापासून एकही आमसभा तर नाहीच पण साधी बैठक अथवा आढावा बैठकही न झाल्याने शासनाने या भागासाठी कोणकोणत्या योजना राबविल्या, यासाठी अनुदान किती? आदि माहितीपासून येथील जनता अज्ञभिज्ञ असल्याचे दिसते.
रस्त्याची प्रचंड दुरवस्था
या भागातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून यात धामणगाव ते टाकेद रस्त्यावर प्रचंड खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. याबरोबरच टाकेद-वासाळी रस्ता, घोटी-सिन्नर राज्यमार्ग, टाकेद फाटा ते अधरवड, टाकेद, वासाळी फाटा ते आंबेवाडी कुरुंगवाडी या रस्त्याची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्याने दयनीय अवस्था झाली आहे. याजबरोबर अडसरे ते टाकेद रस्त्यावरील पुलाचे काम गेली
अनेक वर्षांपासून रखडल्याने या भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष
शासनाकडून राबविलेल्या पाणीपुरवठा योजना या भागातील अनेक गावात स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या उदासीन धोरणामुळे व आमदार वाजे यांच्या दुर्लक्षामुळे बंद अवस्थेत आहेत.
यातील काही योजनेतील विद्युत मोटारींची बिले न भरल्यामुळे तर काही ठिकाणची सामग्री जीर्ण झाल्यामुळे व चोरीला गेल्यामुळे बंद अवस्थेत असल्याने याचा सर्वाधिक फटका महिला वर्गाला बसत आहे.
पावसाने या भागाकडे पाठ फिरविल्याने या भागातील पाणीटंचाई ऐन पावसाळ्यात जैसे थे असल्याचे दिसते.
शिक्षण व आरोग्याची ऐसी तैसी
या भागातील प्राथमिक शाळातील शिक्षणासह आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचवावा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी शासन सर्वशिक्षा अभियानातून शाळांसाठी विविध योजना राबवित असताना, शिक्षकावर लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्याने या योजना या भागात नामधारी ठरल्या आहेत. या भागातील अनेक शिक्षक नाशिक, भगूर, घोटी, राजूर येथून ये- जा करीत असल्याने उशिरा शाळा भरून लवकर सोडण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत.
तर अनेक शिक्षक पंधरा पंधरा दिवस शाळेकडे ढुंकूनही पाहत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. या भागात धामणगाव व खेड
येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या मनमानी कारभारामुळे गोरगरीब जनतेला विनामूल्य मिळणारी आरोग्यसेवा संपूर्णपणे ढासळली
आहे.