राज यांच्याकडून मनपाच्याच सत्तेसाठी पायाभरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 01:29 AM2019-10-19T01:29:03+5:302019-10-19T01:30:19+5:30
शहरासाठी खूप कामे केली; परंतु नाशिककरांनी नाकारले आणि ज्यांनी काहीच दिले नाही त्यांना मात्र भरभरून सत्ता दिली, असे सांगून राज ठाकरे यांनी आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलेच; परंतु विधानसभा निवडणूक असताना महापालिकेतील कामांनाच उजाळा दिला आणि कितीही नाकारले तरी नाशिकवर माझे प्रेम आहे, असे सांगत पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीसाठी येईलच, असे सांगून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पायाभरणी करण्याचा प्रयत्न केला.
नाशिक : शहरासाठी खूप कामे केली; परंतु नाशिककरांनी नाकारले आणि ज्यांनी काहीच दिले नाही त्यांना
मात्र भरभरून सत्ता दिली, असे सांगून राज ठाकरे यांनी आपल्या मनातील शल्य बोलून दाखवलेच; परंतु विधानसभा निवडणूक असताना महापालिकेतील कामांनाच उजाळा दिला आणि कितीही नाकारले तरी नाशिकवर माझे प्रेम आहे, असे सांगत पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीसाठी येईलच, असे सांगून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पायाभरणी करण्याचा प्रयत्न केला.
२००९ मध्ये मनसेचे तीन आमदार निवडून आले आणि त्याहीपेक्षा मनसेची पहिली सत्ता २०१२ मध्ये नाशिक महापालिकेत आली. त्यावेळी न भूतो न भविष्यती अशी कामे केल्याचा राज यांचा दावा आहे. अनेक प्रकल्प सामाजिक दायित्व निधीतून करण्यात आले, असे अनेक दावे राज हे करतात.
बुधवारी (दि.१६) नाशिकमधील सभेतदेखील त्यांनी तोच सूर आळवला. मात्र, इतकी कामे करून सत्ता मिळाली नाही. त्यामुळे नाशिककरांच्या मनात काय आहे तेच कळत नाही, असे सांगत त्यांनी अर्थात नाशिककरांवर माझे प्रेम आहे आणि मी पुन्हा महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळी येईलच, असे सांगून त्यांचे लक्ष विधानसभेपेक्षा नाशिक महापालिकेवर अधिक असल्याचे दाखवून दिले किंबहुना राज यांनी या निवडणुकीसाठी आतापासूनच पायाभरणी केल्याचे दिसून आले.
विशेष म्हणजे आता विधानसभा निवडणुकीचा प्रचार असताना त्यांनी २००९ मध्ये निवडून आलेल्या मनसेच्या आमदारांनी काय कामे केली यापेक्षा महापालिकेच्या काळातील कामे सांगितल्याने त्यांचा कल महापालिकेकडेच अधिक असल्याचे स्पष्ट झाले. लोकसभा निवडणूक लढविली नाही. विधानसभा निवडणुकीत मोजक्याच जागा लढवत आहे; परंतु नाशिक महापालिकेत मात्र पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे त्यांनी दर्शवून दिले.
ढिकले यांना अनुल्लेखाने मारले..
राज ठाकरे यांनी अॅड. राहुल ढिकले यांच्याकडे पक्षाची स्थानिक सूत्रे दिली होती. मात्र, त्यानंतर ते निवडणूक येताच भाजपत दाखल झाले; परंतु राज यांनी त्यांचा फारसा समाचार न घेता बुधवारी झालेल्या सभेत दुर्लक्ष केले. काही लोक सत्तेच्या मागे जातात, गुळामागे मुंगळे जातात तसे ते गेले एवढाच एक उल्लेख करून पुढे महत्त्व दिले नाही.