शहरात साडेचार लाख घरे, अधिकृत नळजोडण्या अवघ्या १ लाख ९७ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:16 AM2021-02-11T04:16:03+5:302021-02-11T04:16:03+5:30

नाशिक - शहराची लाेकसंख्या वाढतच असून, गेल्या दहा वर्षात ती १४ लाखांवरून वीस लाखांवर पोहोचली आहे. मात्र, महापालिकेकडे चार ...

Four and a half lakh houses in the city, only 1 lakh 97 thousand with official plumbing | शहरात साडेचार लाख घरे, अधिकृत नळजोडण्या अवघ्या १ लाख ९७ हजार

शहरात साडेचार लाख घरे, अधिकृत नळजोडण्या अवघ्या १ लाख ९७ हजार

Next

नाशिक - शहराची लाेकसंख्या वाढतच असून, गेल्या दहा वर्षात ती १४ लाखांवरून वीस लाखांवर पोहोचली आहे. मात्र, महापालिकेकडे चार लाख ५५ हजार मिळकतींचीच नोंदणी असून, त्यातही नळजोडण्या अवघ्या १ लाख ९७ हजारच आहेत. शहरातील सोसायट्यांना एकच नळजोडणी असते, असे मान्य केले तरी शहरातील लाेकसंख्येच्या तुलनेत नळजोडण्या कमी आहेत. बोगस नळजोडण्या अधिक असल्याची चर्चा कायम होत असली, तरी महापालिकेकडून त्या शोधण्याचे धाडस मात्र केले जात नाही. पर्यायाने हजारो लीटर पाण्याची रोज चोरी होत असून, त्यामुळे महापालिकेचा महसूलदेखील बुडत आहे.

२०११मध्ये झालेल्या जनगणनेनुसार नाशिक शहराची लोकसंख्या १४ लाख ८६ हजार आहे. आता नव्याने जनगणना करण्याची वेळ आली आहे. कोरोनामुळे जनगणना रखडली आहे. त्यामुळे अद्याप अधिकृत लाेकसंख्या घोषित झालेली नाही. परंतु, दहा वर्षात लोकसंख्या किमान पाच लाखाने वाढली, असे मानले जाते. त्यामुळे नाशिकची लोकसंख्या वीस लाखांवर आहे. नाशिक महापालिकेकडे अधिकृत घरांची नोंदणी ४ लाख ५५ हजार इतकी आहे. मात्र, नळजोडणीचा विचार केला तर केवळ १ लाख ९७ हजार १७८ नळजोडण्या आहेत. त्यातही मीटर फक्त १ लाख ९६ हजार ५१६ इतकेच आहेत. नाशिक महापालिकेच्यावतीने दरडोई सरासरी दीडशे लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या दैनंदिन पाचशे दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात असला, तरी महापालिकेकडे साडेबेचाळीस (४२) टक्के नॉन मीटरींग वॉटर आहे. त्याचा विचार केला तर शहरात मोठ्या प्रमाणात बिलिंग हाेत नसल्याचेदेखील आढळते. परंतु, त्याच्या वसुलीसाठी किमान दुहेरी जोडणी आणि बेकायदा नळजोडण्या शोधण्याची गरज आहे. मात्र, याची अंमलबजावणी करण्याबाबत महापालिका उदासिन आहे.

कोट....

शहरात अनधिकृत नळजोडण्या किती आहेत, याबाबत माहिती घेण्याचे आणि या शोध मोहिमेची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांकडे असून, त्यांच्या स्तरावर कार्यवाही होत असते.

- शिवाजी चव्हाणके, अधीक्षक अभियंता, पाणी पुरवठा विभाग, मनपा

इन्फो..

शहराची लोकसंख्या २० लाख

एकूण घरे ४ लाख ५५ हजार

अधिकृत नळधारक १,९७,१७८

इन्फो..

४२ टक्के नॉन रेव्हेन्यू वॉटर

महापालिकेने पाणी पुरवठ्याचे ऑडिट एका खासगी एजन्सीकडून करून घेतले असून, त्यात साडेबेचाळीस टक्के नॉन रेव्हेन्यू वॉटर असल्याची नोंद केली आहे. त्यात ‌गळतीचादेखील समावेश असला तरी किमान वीस टक्के पाण्याचे बिलिंगच होत नसल्याचेही आढळले आहे. त्यामुळे तीन धरणांमधून उपसा केलेले ६० टक्के पाणीच नागरिकांसाठी असेल तर उर्वरित ४० टक्के पाण्याचा हिशेब महापालिका कधी घेणार, हा देखील प्रश्न आहे.

------

८१ कोटी रूपयांची थकली पाणीपट्टी

* नाशिक महापालिकेकडून त्रैमासिक पद्धतीने पाणीपट्टी वसूल केली जाते. परंतु, त्यासाठी बहुतांश ठिकाणी शहरात देयकेच दिली जात नाहीत. अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण देऊन पाणीपट्टीची देयके वाटणे जवळपास बंद आहे.

* शहरातील अनेक भागात नागरिक पाणी जोडणी घेण्यासाठी महापालिकेत चकरा मारतात. त्यांना जोडणी प्लंबरमार्फत दिली जाते. परंतु, नंतर पट्टीच लावली जात नाही.

----

हजारो अनधिकृत नळजोडण्या

महापालिकेने बोगस नळजोडण्यांविरोधात मोहीम राबविण्याची घोषणा काही वर्षांपूर्वी केली होती. मात्र, त्यानंतर त्यावर कार्यवाही झालेली नाही. मनपाचा बहुतांश कारभार प्लंबर भरोसे असून, आजी-माजी नगरसेवकांनी दिलेल्या अनेक बेकायदा जोडण्या शोधण्याचे धाडस महापालिका करत नाही.

Web Title: Four and a half lakh houses in the city, only 1 lakh 97 thousand with official plumbing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.