चार दिवसांत साडेतीन लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 01:40 AM2019-11-18T01:40:18+5:302019-11-18T01:40:40+5:30
हेल्मेट, सीट बेल्टचा वापर न करणारे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध शहरात गुरुवारपासून शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई केली जात आहे. या चार दिवसांत १ हजार ३०४ बेशिस्त वाहनधारकांनी सुमारे ३ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांना भरला आहे.
नाशिक : हेल्मेट, सीट बेल्टचा वापर न करणारे तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध शहरात गुरुवारपासून शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई केली जात आहे. या चार दिवसांत १ हजार ३०४ बेशिस्त वाहनधारकांनी सुमारे ३ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा दंड वाहतूक पोलिसांना भरला आहे. चौथ्या दिवशी रविवारी (दि.१७) २४७ पेक्षा अधिक बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चालूवर्षी ११ महिन्यांत १३९ नाशिककरांचा रस्त्यांवर अपघाती मृत्यू झाला आहे. हेल्मेट न घातल्यामुळे अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने ६७ दुचाकीस्वारांचा बळी गेला. तसेच दहा चारचाकीचालकांनी सीटबेल्टचा वापर न केल्याने त्यांचाही अपघाती मृत्यू झाला. अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक शाखेकडून वारंवार जनजागृती मोहीम, दंडात्मक कारवाई केली जाते, मात्र तरीदेखील काही दिवसांनी नाशिककरांमध्ये पुन्हा उदासीनता निर्माण होते आणि हेल्मेट, सीटबेल्टच्या वापराकडे कानाडोळा केला जातो. त्यामुळे गुरुवारपासून येत्या रविवारपर्यंत शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस व संबंधित पोलीस ठाण्याचे कर्मचारी मिळून संयुक्तरीत्या विशेष मोहीम राबविली जात आहे. वाहतूक नियम न पाळणाºया वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. त्यासाठी पोलीस ठाणेनिहाय नाकाबंदी केली जात आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करत शहरात वाहने दामटविणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर वाहने उतरविल्यानंतर कुठल्याहीप्रकारच्या वाहतुकीच्या नियमाकडे कानाडोळा करता कामा नये, तसे आढळून आल्यास संबंधितांकडून दंड आकारण्यात येणार आहे.
दणका : रविवारी ६१ हजार वसूल
मोहिमेच्या चौथ्या दिवशी शहरात सकाळ-संध्याकाळ प्रत्येकी दोन तासांत २४७ बेशिस्त वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करत ६१ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये ४० विनाहेल्मेटधारक दुचाकीस्वार, २५ सीटबेल्ट न लावणारे चारचाकीचालकांसह ३५ बेशिस्त रिक्षाचालकांविद्ध पोलिसांनी कारवाई केली. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले यांनी सांगितले.