मास्क न वापरणाऱ्या साडेचार हजार नागरिकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:16 AM2021-04-01T04:16:09+5:302021-04-01T04:16:09+5:30
नाशिक: जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रसार टाळण्यासाठी नागरिकांना मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवण्याचे प्रशासनाकडून आवाहन केले जात ...
नाशिक: जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रसार टाळण्यासाठी नागरिकांना मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवण्याचे प्रशासनाकडून आवाहन केले जात असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीना आदेश देण्यात आले असून गेल्या पंधरा दिवसात ग्रामीण भागातील ४२२० नागरिकाना दंड ठोठावून सात लाखाहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सुमारे १४०० ग्रामपंचायतींना १५ मार्चपासून या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाने म्हटले आहे. ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची संख्या ९ हजाराच्या आसपास पोहचली असून, त्यासाठी मास्कचा वापर न करणे, सुरक्षित अंतर न पाळणे, धार्मिक विधी, अंत्यसंस्कार, लग्नसमारंभात गर्दी करणे ही कारणे असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. ते टाळण्यासाठी जनजागृती केली जात असूनही उपयोग होत नसल्यामुळे सक्त कारवाई करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यासाठी ग्रामसेवकाना विशेष अधिकार प्रदान करण्यात आले आहेत, त्यानुसार मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीला शंभर ते पाचशे रुपये दंड आकारण्यात येत असून, त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांत ४२४२ नागरिकांना दंड ठोठावून सात लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
चौकट-------
जिल्ह्यातील दंडात्मक कारवाई
बागलाण- ६०५ (७३८८०); चांदवड- ३०५(५४४००); देवळा- २०४ (३३८००); इगतपुरी- ७५७(१,३६,६००); कळवण- २०५ (३८३५०); मालेगांव- ३६५ (६७६००); नाशिक- २०६ (३२६५०); नांदगाव- २३१ (२१३००); निफाड- ५१२ (९६४००); पेठ- ८९ (१७३००); सुरगाणा- ९ (९००); सिन्नर- ४८ (८६५०); त्रिंबक- १५९ (३०७००); येवला- २२९(४५००).