साडेचार वर्षे आरोप-प्रत्यारोप, आता गळ्यात गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:46 AM2019-03-16T01:46:36+5:302019-03-16T01:47:45+5:30
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जागावाटपावरून युती फिस्कटली आणि नंतर आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला. नाशिकमध्येदेखील भाजपाला विरोधकांच्या मदतीने कोंडीत आणण्याची खेळी ज्या शिवसेनेने खेळली त्याच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.१५) मात्र भाजपा कार्यालयात हजेरी लावली आणि तुझ्या गळा, माझ्या गळा असे गीत गात युती अभेद्य असल्याचे नारे लावले.
नाशिक : गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी जागावाटपावरून युती फिस्कटली आणि नंतर आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला. नाशिकमध्येदेखीलभाजपाला विरोधकांच्या मदतीने कोंडीत आणण्याची खेळी ज्या शिवसेनेने खेळली त्याच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.१५) मात्र भाजपा कार्यालयात हजेरी लावली आणि तुझ्या गळा, माझ्या गळा असे गीत गात युती अभेद्य असल्याचे नारे लावले.
राजकारणात मित्रत्व आणि शत्रुत्व कायम राहत नसले तरी गेले साडेचार वर्षे राज्यात वेगळेच वातावरण होते. सत्तेत असूनही सतत भाजपाला शिवसेना लक्ष करीत होते. नाशिकमधील प्रकल्प विदर्भात पळविणे आणि नाशिकचे पाणी मराठवाड्याला देणे या विषयावरून शिवसेनेने भाजपाला जेरीस आणताना सरकारच्या विरोधात मोर्चाही काढला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण बदलले दोन्ही पक्षं पुन्हा एकत्र आले. नेतेच एकत्र आल्यानंतर स्थानिक पातळीवर काय होणार, शिवसेनेचे मंत्री आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. १५) वसंत स्मृतीची पायरी चढली आणि युती झाली आता एकत्र आहोत असे दाखविले. आमच्यात मतभेद होते, परंतु मनभेद कधीही नव्हते असे सांगत उभयतांनी एकत्र राहण्याची पुन्हा एकदा ग्वाही दिली. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशामुळे
एकत्र आल्याचेदेखील त्यांनी सांगितले.
दरम्यान, ग्राम विकास राज्यमंत्री दादा भुसे, माजी मंत्री बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे व हरिश्चंद्र चव्हाण, महापौर रंजना भानसी, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी भाजपाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादाजी आहेर तसेच आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, शिवसेनेचे आमदार योगेश घोलप, राजाभाऊ वाजे आदि यावेळी उपस्थित होते.