रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीप्रकरणी चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:16 AM2021-05-18T04:16:36+5:302021-05-18T04:16:36+5:30
आडगाव पोलीस : २० रेमडेसिविर जप्त ---- पंचवटी : कोरोना रुग्णांना लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन जादा दराने विक्री करून रुग्णांची ...
आडगाव पोलीस : २० रेमडेसिविर जप्त
----
पंचवटी : कोरोना रुग्णांना लागणारे रेमडेसिविर इंजेक्शन जादा दराने विक्री करून रुग्णांची आर्थिक लूटमार करणाऱ्या टोळीतील आणखी चौघा संशयितांचा आडगाव पोलिसांनी पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून ६१ हजार रुपये किमतीचे सुमारे २० रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले आहेत. आडगाव पोलिसांनी इंजेक्शन विक्री करणाऱ्या टोळीतील तिघाजणांना पालघर जिल्ह्यातील वाडा येथून तर एकाला नाशिक शहरातून ताब्यात घेतले आहे.
चार दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन, आडगाव पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत तिघा नर्स आणि सिडकोतील मेडिकल दुकानात काम करणाऱ्या एका युवकासह चौघांना रेमडेसिविर इंजेक्शन काळ्याबाजारात ज्यादा दराने विक्री केल्याप्रकरणी अटक करून दोन इंजेक्शन जप्त केले होते. आता एकूण या प्रकरणात पोलिसांनी तब्बल आठ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण सुमारे ६७ हजार रुपये किमतीचे २२ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले आहे. रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलेल्यात आत्तापर्यंत आडगाव पोलिसांनी केलेली शहरातील सर्वांत मोठी कारवाई असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. गेल्या गुरुवारी रात्री आडगाव शिवारात के. के. वाघ महाविद्यालयासमोर अन्न व औषध प्रशासन आणि आडगाव पोलिसांनी संयुक्त केलेल्या कारवाईत ५४ हजार रुपयांना दोन रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करताना जागृती शरद शार्दुल, श्रुती रत्नाकर उबाळे या दोन नर्सला रंगेहात ताब्यात घेतले होते. त्यानंतर सदर इंजेक्शन स्नेहल पगारे व कामेश बच्छाव देत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या होत्या तर रेमडेसिविर इंजेक्शन विक्री करणाऱ्या टोळीत आणखी काही जणांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले त्यातून सुनील गुप्ता, महेश पाटील, (रा. विरार), अभिषेक शेलार (रा. वाडा, पालघर) व राहुल मुठाळ (रा. नाशिक) अशा चौघांची नावे पुढे आल्याने आडगाव पोलिसांनी गुप्ता, पाटील शेलार या तिघांना पालघर जिल्ह्यातील वाडा येथून व मुठाळला नाशिक शहरातून अटक केली आहे. पोलीस निरीक्षक इरफान शेख पोलीस हवालदार सुरेश नरवडे, दशरथ पागी, विजय सूर्यवंशी आदींसह पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे.
रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीप्रकरणी आडगाव पोलिसांनी आता एकूण आठ संशयित आरोपींना अटक केली असून त्यात तीन महिला नर्सचा समावेश आहे, तर पोलिसांनी संशयितांकडून एकूण २२ रेमडेसिविर इंजेक्शन जप्त केले आहे. सोमवारी पोलिसांनी सर्व संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.