म्हसरूळला घरफोडी करणाऱ्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 01:51 AM2022-07-02T01:51:13+5:302022-07-02T01:51:34+5:30
म्हसरूळ शिवारात पंधरवड्यापूर्वी घरफोडी करणाऱ्या चौघांना म्हसरूळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून पावणेतीन लाख रुपयांचे नऊ तोळे सोने-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी या कारवाईत संशयित सुरेंद्र छेदीलाल पासवान, संतोष उर्फ बाळू चांदू आरसाड, सचिन भारत ठोके व रवि विठोबा कुंदे या चौघांना अटक केली आहे.
पंचवटी : म्हसरूळ शिवारात पंधरवड्यापूर्वी घरफोडी करणाऱ्या चौघांना म्हसरूळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून पावणेतीन लाख रुपयांचे नऊ तोळे सोने-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी या कारवाईत संशयित सुरेंद्र छेदीलाल पासवान, संतोष उर्फ बाळू चांदू आरसाड, सचिन भारत ठोके व रवि विठोबा कुंदे या चौघांना अटक केली आहे.
म्हसरूळ भागातील संभाजीनगर परिसरातील नाद ब्रह्म सोसायटीत राहणाऱ्या प्रवीणकुमार मुलचंद राठोड यांच्या घरी दि. १३ जूनला धाडसी घरफोडी झाली होती. चोरट्यांनी राठोड यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातून सुमारे नऊ तोळे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली होती. दोन दिवसांपूर्वी म्हसरूळ पोलीस ठाण्याचे कर्मचारी बाळासाहेब मुर्तडक, सतीश वसावे, योगेश शिंदे आदी गस्त घालत असताना एक संशयित पोलिसांना बघून पळाला व नाल्यात जाऊन लपला पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले व त्याची चौकशी केली. या चौकशीत त्याने उत्तर प्रदेशच्या कानपूर येथील सुरेंद्र छेदिलाल पासवान ( सध्या रा. सध्या शांतीनगर मखमलाबाद) हिंगोलीतील संतोष उर्फ बाळू चांदू आरसाड, सचिन भारत ठोके (दोघेही सध्या रा. शांतीनगर मखमलाबाद येथील बांधकाम साइट) तसेच रवि विठोबा कुंदे ( रा. पवार मळा ) यांच्या मदतीने म्हसरूळला घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या अन्य साथीदारांना यशवंतराव महाराज पटांगण, एरंडवाडी, मातोरी भागातून अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून नऊ तोळे सोने-चांदीचे दागिने जप्त केले आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे, सुधीर पाटील, विष्णू हळदे, पंकज चव्हाण, दिनेश गुंबाडे, जितेंद्र शिंदे आदींनी ही कामगिरी केली आहे.