जिल्ह्यातून चार बसेस मध्य प्रदेशकडे रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:34 PM2020-05-10T22:34:24+5:302020-05-10T22:35:19+5:30
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये सोडण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून मध्य प्रदेशकडे चार बस रवाना झाल्या आहेत.
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी केलेल्या बसची व्यवस्था करतेसमयी तहसीलदार अर्चना पागिरे, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरख बोडके, आगारप्रमुख संदीप पाटील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये सोडण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून मध्य प्रदेशकडे चार बस रवाना झाल्या आहेत.
शुक्रवारी (दि. ८) इगतपुरी, घोटीजवळ मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून हजारोंच्या संख्येने परप्रांतीय नागरिकांनी मूळ गावी जाण्यासाठी रस्त्यावर गर्दी केल्यामुळे महामार्ग ठप्प झाला होता. यामुळे इगतपुरी प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. इगतपुरीत अडकून पडलेल्या मजुरांनी दोन दिवसांपूर्वी शासकीय आरोग्य केंद्रामार्फत मेडिकल दाखला मिळविला आहे.
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या हद्दीपर्यंत जाता यावे यासाठी शनिवार-रविवारच्या मध्यरात्री १२ वाजता कसारा घाटातील घाटनदेवी मंदिराजवळ असलेल्या चेकपोस्टवरून इगतपुरी आगाराच्या चार बस मध्य प्रदेशच्या दिशेने सोडण्यात आल्या. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बसची व्यवस्था केल्याने कसारा घाटातून पायी चालत जाणाऱ्या मजुरांना या बसमधून त्यांच्या राज्याच्या दिशेने रवाना करण्यात आले.
यावेळी तहसीलदार अर्चना पागिरे-भाकड, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, इगतपुरीचे आगारप्रमुख संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, माजी जि. प. सदस्य गोरख बोडके, खरेदी विक्र ी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लहने, महसूल, आरोग्य, ग्रामविकास विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.