नांदगाव नगरपरिषदेवर तीन वर्षात चार मुख्याधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:08+5:302021-07-07T04:16:08+5:30

नांदगाव : ऐशींच्या दशकात दर तीन महिन्यांनी बदलणारा नगराध्यक्ष यामुळे नांदगाव नगरपरिषद महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली होती. तोच काळ आता ...

Four chief officers on Nandgaon Municipal Council in three years | नांदगाव नगरपरिषदेवर तीन वर्षात चार मुख्याधिकारी

नांदगाव नगरपरिषदेवर तीन वर्षात चार मुख्याधिकारी

Next

नांदगाव : ऐशींच्या दशकात दर तीन महिन्यांनी बदलणारा नगराध्यक्ष यामुळे नांदगाव नगरपरिषद महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली होती. तोच काळ आता कोरोना काळात नांदगावकर अनुभवत असून तीन वर्षांत चार मुख्याधिकारी बदलले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कामकाजाची घडी बसणे अवघड होऊन बसले आहे.

ऐशीच्या दशकात बहुमत अनेक तुकड्यामध्ये विभागले गेल्याने सत्तेच्या राजकारणात विकासाचा बट्ट्याबोळ झाला होता. संवर्गातले मुख्याधिकारी राजकीय अराजकतेमुळे येथे यायला तयार नव्हते. त्यामुळे महसूल विभागातल्या अव्वल कारकुनापासून नायब तहसीलदार व कधी कधी तहसीलदार यांचेकडे मुख्याधिकारीपद यायचे. महसूल विभागात मुख्याधिकारी पदापासून दूर पळण्याची स्पर्धा असायची. मुख्याधिकारी पदावर बसलेला मुख्याधिकारी राजकीय दबावामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह व हृदयविकाराचा बळी होतो असा समज झाल्याने कोणीही पद स्वीकारायला तयार होत नसत.

तो काळ पुन्हा: आला की काय, अशी शंका यावी इतक्या पटापट मुख्याधिकारी येथून बदलून जात आहेत. आजच्या काळात पूर्वीसारखी परिस्थिती नाही. राजकीय स्थिरता आहे. नगराध्यक्ष आपला काळ पूर्ण करत आहेत. कोणत्याही प्रकारची राजकीय रस्सीखेच नाही. तरीही कोरोना काळात नांदगाव नगरपरिषदेचे तीन मुख्याधिकारी कार्यकाळ पूर्ण न करता बदलून गेल्याने राजकीय वर्तुळात व सामान्यातही चर्चा रंगली आहे. बदलीचा आदेश काढणे व तो पुन्हा रद्द करून पुन्हा काढणे एवढे सोपे झाले आहे काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

इन्फो

तीन वर्षांचा कालावधी

मुख्याधिकारी पदाचा कार्यकाळा हा तीन वर्षांसाठी असतो. तीन वर्षे सलग राहिल्याने मुख्याधिकाऱ्याची प्रशासनावर पकड बसून त्याला कामकाजात सुसूत्रता आणणे सोपे जाते. त्यामुळे तीन वर्षे तरी कार्यकाळ पूर्ण केल्याशिवाय बदल्या होत नाहीत. वादग्रस्त असेल तरच त्या ठिकाणी बदलीचा प्रश्न निर्माण होतो. परंतु, नांदगावी कसलीही वादाची पार्श्वभूमी अथवा वादाचे प्रसंग नसताना मुख्याधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्या चर्चेचा विषय बनला आहे.

इन्फो

मुख्याधिकारी पदाचा कार्यकाळ

मुख्याधिकारी महिने

वसुधा कुरणावळ/देवचके - २४.९ महिने

पंकज गोसावी - ९.२ महिने

निर्मला गायकवाड- १.९ महिने

विवेक धांडे - १ जुलै २०२१ पासून

Web Title: Four chief officers on Nandgaon Municipal Council in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.