इगतपुरीत चार कोटींचे नुकसान
By admin | Published: August 6, 2016 11:15 PM2016-08-06T23:15:01+5:302016-08-06T23:17:12+5:30
पावसाचा तडाखा : पुरामुळे शेती, रस्ते, घरांची पडझड
बेलगाव कुऱ्हे : इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या जोरदार अतिवृष्टीने कहर केल्याने नद्या, नाले यांना आलेल्या महाभयंकर पुरामुळे शेती, रस्ते, घरांची पडझड व इतर सार्वजनिक मालमत्तेचे असे एकूण सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील वाडीवऱ्हे व नांदगाव बुद्रुक या दोन मंडळात महसूल व कृषी विभागाची यंत्रणा युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करीत आहेत. भावली धरण क्षेत्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर दारणा व कडवा धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे.
इगतपुरी तालुक्यात सरासरी तीन हजार ५०० मिमी पर्जन्यमान होते. जुलै अखेरपर्यंत अवघा एक हजार मिमीच्या आसपास पाऊस झाला होता; मात्र त्यानंतर पावसाने जोरदार मुसंडी मारत तालुक्यात हाहाकार केला. धरणे, नदी, नाले तुडुंब भरून पूर पाण्याने वाहू लागल्याने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण होऊन शेती व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. वाडीवऱ्हे मंडळ विभागातील वाडीवऱ्हे, गोंदे दुमाला, पाडळी, मुकणे, मुरंबी, कुऱ्हेगाव, गडगडसांगवी, लहांगेवाडी आदि तसेच नांदगाव बुद्रुक मंडळातील साकूर, नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, जानोरी, कृष्णगर, लक्ष्मीनगर व आदिवासी बारा वाड्यांमध्ये भात, नागली, वरई तसेच ऊस, टमाटे, वांगे, सोयाबीन, काकडी आदि लागवड केलेल्या भाजीपाला पिके भुईसपाट होऊन शेतीही वाहून गेली आहे.
जवळपास सर्वच ठिकाणी शेतीचे बांध फुटून शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. नदीला आलेल्या पुरात बेलगाव येथील पाच म्हशी वाहून गेल्या आहेत.
दरम्यान या सर्व गावांमध्ये फिरून बघितले असता शासकीय यंत्रणेकडून जवळपास सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून अद्यापही पंचनामे व शेतकऱ्यांच्या बांधबंदिस्तीचे नुकसान पूर ओसरल्याने समोर येत आहे. विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याने वीजपुरवठा खंडित झालेला आहे.
(वार्ताहर)