‘खंडवा’ला चार दिवसांची कोठडी
By admin | Published: August 26, 2016 12:31 AM2016-08-26T00:31:25+5:302016-08-26T00:31:33+5:30
‘खंडवा’ला चार दिवसांची कोठडी
नाशिक : महाविद्यालयीन युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक यांना विविध क्लृप्त्या लढवून रिक्षा किंवा दुचाकीवरून निर्जन ठिकाणी नेऊन त्यांना शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या ‘खंडवा’ या सराईत गुन्हेगाराला न्यायालयाने येत्या सोमवार (दि.२९) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे दोन ते अडीच महिन्यांपासून जबरी लूट करणारा पंचवटीमधील सराईत गुन्हेगार नीलेश अशोक सोनवणे ऊर्फ खंडवा नाशिककरांमध्ये दहशत पसरवित होता. अनेकदा पोलिसांच्या नजरेत धूळफेक करून नीलेश सोनवणे पळून जाण्यात यशस्वी होत होता. खंडवा हा देवळाली, शिंदे, वणी या परिसरात वेशभूषा बदलून राहात होता. पंधरवड्यानंतर तो राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने त्याला ताब्यात घेण्यास पोलिसांना अडचणी निर्माण होत होत्या. सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील काही कर्मचाऱ्यांची निवड केली. गोपनीय माहितीच्या आधारे या पथकाने सापळा रचून खंडवा यास लासलगाव येथून अटक केली. त्याच्याकडून विविध गुन्ह्यांमध्ये वापरलेली एअर पिस्तूल, मोटारसायकल, चार मोबाइल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सरकारवाडा, पंचवटी आदि पोलीस ठाण्यांमध्ये सोनवणेविरुद्ध जबरी लूट, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला विविध गुन्ह्यांमध्ये साथ देणाऱ्या काही संशयितही पोलिसांच्या रडारवर असून त्यांच्याही मुसक्या आवळण्याची तयारी सुरू केली आहे.