नाशिकसाठी चार दिवस धोक्याचे; अवकाळी पाऊस पुन्हा देणार दणका; उद्या ‘ऑरेंज अलर्ट’

By अझहर शेख | Published: April 25, 2023 01:29 PM2023-04-25T13:29:14+5:302023-04-25T13:29:40+5:30

राज्यात पाच दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.

Four days of danger for Nashik; Unseasonal rain will give a bang again; Orange alert tomorrow | नाशिकसाठी चार दिवस धोक्याचे; अवकाळी पाऊस पुन्हा देणार दणका; उद्या ‘ऑरेंज अलर्ट’

नाशिकसाठी चार दिवस धोक्याचे; अवकाळी पाऊस पुन्हा देणार दणका; उद्या ‘ऑरेंज अलर्ट’

googlenewsNext

नाशिक : जिल्ह्यात मागील महिन्यापासून अवकाळी पावसाचे धुमशान सुरूच आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने बळीराजाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता; मात्र पुन्हा एकदा अवकाळीचे ढग दाटून येणार असल्याचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिल्याने शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे. पुढील चार दिवस नाशिक जिल्ह्यासाठी धोकादायक राहणार आहेत. बुधवारी (दि. २६) ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

राज्यात पाच दिवसांत अपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी मंगळवारी (दि. २५) ‘यलो अलर्ट’ तर बुधवारी ‘ऑरेंज’ आणि पुढे शुक्रवारपर्यंत पुन्हा यलो अलर्ट दर्शविण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व गडगडाटी पाऊस जिल्ह्यात होऊ शकतो. यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना सोमवारी (दि.२४) तातडीने आदेशित करत उपाययोजना व विविध सूचना देण्याबाबत पत्र काढले आहे.

दरम्यान, गेल्या १ मार्चपासून आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात ५०.१ मिमी. इतका बेमोसमी पाऊस झाल्याची नोंद हवामान केंद्रात करण्यात आली आहे. बेमोसमी पावसाने दीड महिन्यात अर्धशतक पूर्ण केले आहे. यंदा नाशिक जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतपिकांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आर्थिक नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून आटोपले जात नाहीत; तोच पुन्हा दारावर संकट येऊन उभे राहिले आहे. ७ एप्रिल ते १६ एप्रिल या पंधरवड्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीमुळे शेतीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून अलीकडेच पूर्ण केले गेले. अद्याप अंतिम प्रपत्रदेखील सादर झालेले नाही; मात्र पुन्हा चार दिवस पावसाचे दर्शविण्यात आल्याने प्रशासनानेही धसका घेतला आहे.

विजांचा अधिक तीव्र कडकडाट!

विजांचा लखलखाट व ढगांचा गडगडाट सुरू होताच आपले पशुधन हे छप्परबंद निवारागृहात हलवावे, तसेच शेतकरी, शेतमजुरांनीही घरात आश्रय घ्यावा. उघड्यावर थांबू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून करण्यात आले आहे. वीज कोसळून यापूर्वीही मनुष्यहानी जिल्ह्यात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या चार दिवसांमध्ये वीजांचा लखलखाट जास्त तीव्रतेने होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.

Web Title: Four days of danger for Nashik; Unseasonal rain will give a bang again; Orange alert tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.