हृदयद्रावक! नव वधू-वरांवर अक्षता टाकून परतणाऱ्या वऱ्हाडींवर काळाची झडप, चौघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 12:45 PM2022-02-01T12:45:25+5:302022-02-01T12:49:18+5:30
पंडित मोरे यांच्या मुलाचा विवाह सोहळा रविवारी जालना जिल्ह्यातील हतवण येथे पार पडला. या सोहळ्यासाठी गौतमनगर, चुंचाळे शिवारातील रहिवासी ...
पंडित मोरे यांच्या मुलाचा विवाह सोहळा रविवारी जालना जिल्ह्यातील हतवण येथे पार पडला. या सोहळ्यासाठी गौतमनगर, चुंचाळे शिवारातील रहिवासी आयशर ट्रकमधून वऱ्हाडी म्हणून शनिवारी नाशिकमधून निघाले होते. मोरे कुटुंबियांचा लग्न सोहळा आटोपून सर्व वऱ्हाडी मंडळी रविवारी मांडवातून परतीच्या प्रवासाला लागली. औरंगाबाद ओलांडल्यानंतर वैजापूर तालुक्यात शिवराई गावाजवळ रविवारी त्यांच्या आयशर गाडीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे साखरझोपेत असलेल्या वऱ्हाडींना मोठा हादरा बसला. या भीषण अपघातात गौतमनगर व चुंचाळे घरकुल या दोन्ही भागांतील पाच रहिवाशांसह आयशर ट्रकचालकाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
तीन महिलांसह बालक ठार
ललिता पवार, कविता वडमारे, प्रज्ञा गायकवाड या तीन महिलांसह नवरदेवाचे वडील पंडित मोरे तसेच सात वर्षाचा चिमुरडा मोनू वाहुळे याचा मृतांमध्ये समावेश आहे. आयशरचालकाचे नाव उशिरापर्यंत समजू शकले नाही. सोमवारी रात्री चिमुकल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत गौतमनगर, चुंचाळे भागात मृतदेह त्यांच्या नातेवाईकांद्वारे आणण्यात येत होते. या परिसरात सन्नाटा पसरला असून, येथील रहिवाशांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
दुर्घटनेत ३० वऱ्हाडी जखमी
या भीषण दुर्घटनेत २५ ते ३० वऱ्हाडी जखमी झाल्याची माहिती उशिरापर्यंत हाती आली होती. यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर वैजापूरच्या जिल्हा रुग्णालयासह घाटी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच काही जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातदेखील सोमवारी दाखल करण्यात आले. या घटनेमुळे गौतमनगर, शांतीनगर, रमाबाई आंबेडकर घरकुल परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.