समृद्धी महामार्गावरील अपघातात चार ठार; अपघाताची मालिका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 09:15 AM2023-06-12T09:15:49+5:302023-06-12T09:17:19+5:30
इनोव्हा कार चालकाचे नियंत्रण सुटले.
शैलेश कर्पे, सिन्नर (नाशिक): हिंदुहृदयसम्राट सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील सिन्नर तालुक्यात रविवारी (दि. ११ ) मध्यरात्री इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण ठार झाले तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली.
शिर्डी ते भरवीर हा सुमारे ८० किलोमीटर मार्गाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर गेल्या पंधरा दिवसापासून समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात याच महामार्गावर अपघातात तीन जण ठार झाले होते. पुन्हा रविवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याने समृद्धी महामार्गावरील प्रवास धोक्याचा ठरू लागला आहे.
इनोव्हा कार मधील प्रवासी नातेवाईकांना हज यात्रेसाठी मुंबई येथे सोडून शिर्डी कडे परतत असल्याचे समजते. रविवारी (दि. ११) मध्यरात्री बाराच्या सुमारास महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर हद्दीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर किमी ५५५.८ येथे अर्थातच सिन्नर तालुक्यातील खापराळे शिवारात घोटी बाजूकडून शिर्डी बाजू कडे जाणारी इन्होवा का र (क्र MH-19 Y- 6074) हिचे वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भिंतीवर जावून आदळल्याने अपघात झाला. अपघातात रज्जाक अहमद शेख, (५५), सत्तार शेख लाल शेख, (६५), सुलताना सत्तार शेख, (५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर फैयाज दगुभाई शेख (४०) यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. जुबेर रज्जाक शेख, (३५), मैरूनिसा रज्जाक शेख (४५), अझर बालन शेख, (२५) मुस्कान अजर शेख (२२), हे गंभीर जखमी झाले असून सिन्नर येथे प्राथमिक उचारानंतर जखमींना तातडीने शिर्डी येथे पुढील उपचारांसाठी हलविण्यात आले.
पोलीस उपअधीक्षक प्रदीप मौराळे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक शशिकांत गिरी, महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर, महाराष्ट्र सुरक्षा पथक, जलद प्रतिसाद पथक समृध्दी महामार्ग यांनी अतिशय जलद घटनास्थळी धाव घेऊन शिताफीने जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून अॅम्ब्युलन्सने सिन्नर येथे औषधोपचारासाठी दाखल केले.