शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:48 AM2018-06-14T00:48:19+5:302018-06-14T00:48:19+5:30
शहरातील पंचवटी, उपनगर व सिडको परिसरातील चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि़१३) घडली़ आत्महत्या केलेल्यांमध्ये दोन युवक व दोन इसमांचा समावेश असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
नाशिक : शहरातील पंचवटी, उपनगर व सिडको परिसरातील चार वेगवेगळ्या घटनांमध्ये चौघांनी आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि़१३) घडली़ आत्महत्या केलेल्यांमध्ये दोन युवक व दोन इसमांचा समावेश असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ पंचवटीतील फुलेनगर येथील युवकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि़१३) सकाळच्या सुमारास घडली़ सोमनाथ रामदास कडाळे (२२, रा. तीन पुतळे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी आठ वाजेच्या सुमारास कडाळे याने आनंद कोशिरे यांच्या पेरूच्या बागेत विषारी औषध सेवन केले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर त्याचे आजोबा भगवान जाधव यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ तिसरी घटना जेलरोड परिसरातील अयोध्यानगरमध्ये घडली़ मंगळवारी (दि.१२) मध्यरात्रीच्या सुमारास बंगल्याच्या गच्चीवर साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन गणेश सुरेंद्रनाथ सोनार (२७, रा. विश्वनाथ बंगला) या युवकाने आत्महत्या केली़ ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़ दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
तर आत्महत्येची चौथी घटना सिडकोतील पवननगरमध्ये घडली़ कमलाकर शामकांत जोशी (५०) यांनी राहात्या घरी सिलिंगच्या हुकला नॉयलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून, या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दुसरी घटना वडनेर दुमाला येथे मंगळवारी (दि़१३) दुपारी घडली़ सुनील प्रतापसिंह ढाका (४३, रा. भानू निवास, पाथर्डीरोड-वडनेर दुमाला) यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली़ सुनीलचे वडील प्रतापसिंह ढाका व कुटुंबीय पुण्याला गेले होते़ दुपारी चार वाजेच्या सुमारास घरी परतल्यानंतर मुलगा सुनील याच्या तोंडातून फेस येत असल्याचे त्यांना दिसले़ त्यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नसून उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़