जिल्हा बॅँकेचे चौघे संचालक विधिमंडळात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 01:42 AM2019-11-01T01:42:13+5:302019-11-01T01:42:27+5:30
नाशिक : नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणूक रिंगणात राजकीय नशीब अजमाविणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सात संचालकांपैकी चौघांचा विधिमंडळात प्रवेश झाला असून, तिघांना मात्र पराभव पत्करावा लागला आहे.
नाशिक : नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणूक रिंगणात राजकीय नशीब अजमाविणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सात संचालकांपैकी चौघांचा विधिमंडळात प्रवेश झाला असून, तिघांना मात्र पराभव पत्करावा लागला आहे. नाशिक जिल्हा बॅँकेच्या संचालकांना विधिमंडळात निवडून पाठविण्याची परंपरा यंदाही कायम राहिली आहे.
सहकार व शेतकऱ्यांशी निगडित असलेल्या नाशिक जिल्हा बॅँकेचे जिल्ह्यात हजारो सभासद असून, त्यामुळे संचालकांचे मतदार असलेल्या शेतकरी सभासदांशी जवळचा संबंध येत असतो. विविध कारणांसाठी तालुक्यातील शेतकºयांना बॅँकेच्या माध्यमातून मदत केली जात असल्यामुळे प्रामुख्याने विधानसभेच्या निवडणुकीत संचालकांना त्याचा राजकीय फायदा होत असतो. राज्याच्या विधिमंडळात आजवर जिल्हा बॅँकेच्या अनेक संचालकांनी प्रवेश केला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित, चांदवडमधून शिरीष कोतवाल, निफाडमधून दिलीप बनकर, अनिल कदम, नांदगावमधून सुहास कांदे, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे व सिन्नर मतदारसंघातून माणिकराव कोकाटे या सात संचालकांनी रिंगणात उडी घेतली. त्यातील कदम व बनकर हे दोघे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. प्रत्यक्ष मतमोजणीत सात संचालकांपैकी बॅँकेचे उपाध्यक्ष सुहास कांदे, सीमा हिरे, दिलीप बनकर व माणिकराव कोकाटे हे चौघे विधिमंडळात पोहोचले. यातील सुहास कांदे वगळता अन्य तिघे संचालकांनी यापूर्वीही विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. तर जे. पी. गावित, शिरीष कोतवाल, अनिल कदम या तिघा संचालकांना पराभव चाखावा लागला आहे. जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती पाहता, आमदार संचालकांच्या मदतीने सरकार दरबारी बॅँकेला आर्थिक मदत करण्याकामी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.