गॅसगळतीमुळे आगीत चौघांचा होरपळून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 04:20 PM2019-02-20T16:20:09+5:302019-02-20T16:20:28+5:30

दिंडोरी तालुक्यातील घटना : घरासह संसार आगीच्या भक्ष्यस्थानी

Four gas burns due to gas burns | गॅसगळतीमुळे आगीत चौघांचा होरपळून मृत्यू

गॅसगळतीमुळे आगीत चौघांचा होरपळून मृत्यू

Next
ठळक मुद्देरात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातील घरगुती गॅसच्या सिलेंडर मधून गॅसची गळती सुरू झाली. परंतु सदर बाब चौधरी कुटुंबियांच्या लक्षात आली नाही.

दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव नजीक धाऊर येथे मळ्यात वास्तव्यास असलेल्या मुरलीधर हरी चौधरी या शेतकऱ्याच्या घराला गॅस सिलिंडरच्या गळतीनंतर लागलेल्या आगीत त्यांच्यासह कुटुंबियातील चार सदस्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.
मंगळवारी (दि.१९) रात्री चौधरी कुटुंबीयातील सर्व सदस्य जेवण करून झोपी गेलेले असताना रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातील घरगुती गॅसच्या सिलेंडर मधून गॅसची गळती सुरू झाली. परंतु सदर बाब चौधरी कुटुंबियांच्या लक्षात आली नाही. थोड्याच वेळात घराला मोठी आग लागून संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या आगीत मुरलीधर हरी चौधरी (वय ३२), त्यांच्या पत्नी कविता मुरलीधर चौधरी (वय ३०), त्यांचा मुलगा तुषार मुरलीधर चौधरी (वय १०) आणि पुतण्या नमन कैलास चौधरी (वय ८) यांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. आगीत त्यांचे संपूर्ण घर जळून सर्व संसार उपयोगी साहित्यासह मोटरसायकल देखील भस्मसात झाली. घराला लागलेली आग एवढी भयंकर होती की परिसरातील कोणालाही कुठल्याही प्रकारची मदत करता आली नाही. दरम्यान, बुधवारी (दि.२०) सकाळी कळवण पोलीस उपविभागाचे विभागीय अधिकारी देविदास वाघमारे, दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्यासह दिंडोरीचे प्रांताधिकारी उदयकुमार किसवे, दिंडोरीचे तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे व दिंडोरी पोलीस करीत आहेत.
मदत मिळण्यासाठी प्रस्ताव
धाऊर येथील मुरलीधर चौधरी या शेतक-याच्या घराला आग लागून त्यांच्या कुटुंबातील चार व्यक्तींचा दुदैवी मृत्यू झाला. सदर कुटुंबीय दारिद्रय रेषेखालील असल्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळण्यासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवण्यात आला आहे
- बाबासाहेब गाढवे, तहसीलदार


फोटो मेलने पाठवित आहोत...

Web Title: Four gas burns due to gas burns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक