दहा मेंढ्यांसह चार शेळ्या फस्त
By admin | Published: October 30, 2016 02:07 AM2016-10-30T02:07:27+5:302016-10-30T02:08:01+5:30
भोजापूर खोरे : तीन बिबट्यांचा कळपावर हल्ला
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास येथील करवंदरा शिवारात रात्रीच्या वेळेस मुक्कामाला असणाऱ्या मेंढ्यांच्या कळपावर तीन बिबट्यांनी हल्ला केल्याने १० मेंढ्या व चार शेळ्या फस्त केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली असून, भरदिवसा बिबट्याचा संचार वाढल्याने वनविभागाने तातडीने या भागात पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
भोजापूर खोरे परिसरातील चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी आदि भाग डोंगराळ व जंगलव्याप्त असल्याने या परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असतो. चास-दापूर रस्त्यावर करवंददरा हा परिसर असून, येथे मोठ्या प्रमाणात डोंगर व जंगलाचा परिसर आहे. संगमनेर तालुक्यातील साकूर, डिग्रज, मालुंजे आदि भागातील मेंढपाळ शेळ्या व मेंढ्या चारण्यासाठी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या भागात आले आहेत. चास येथील चंद्रकांत महादू खैरनार (गट नं. ४१३) यांच्या शेतात साहेबराव बारकू श्रीराम, रा. डिग्रज,ता. संगमनेर यांच्या मेंढ्यांचा कळप मुक्कामी आहे. नेहमीप्रमाणे साहेबराव श्रीराम आपल्या साथीदारांसह दिवसभर मेंढ्या व शेळ्या चारून आल्यानंतर बुधवारी (दि.२७) रोजी रात्रीच्या वेळेस संरक्षक जाळीचा वेढा ओलांडून तीन बिबट्यांनी मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. रात्रीची वेळ असल्याने बिबट्यांनी अचानक हल्ला केल्याने सर्वत्र गोंधळ उडाला होता. बिबट्याच्या डरकाळ्यांनी परिसर दणाणला होता. एकाचवेळी कळपात तीन-तीन बिबटे मेंढ्यांचे लचके तोडत होते. श्रीराम कुटुंबासमोर हा हल्ला होत असताना त्यांना प्रतिकार करता आला नाही. जखमी केलेल्या काही शेळ्या व मेंढ्या या बिबट्यांनी जंगलाकडे ओढत नेल्या. तेथे त्यांच्यावर ताव मारून अर्धवट खाल्लेल्या अवस्थेतील मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी आढळून आले. अचानक झालेल्या मेंढ्यांवरील हल्ल्याने उर्वरित मेंढ्या व शेळ्या रात्रभर सैरभर फिरत होत्या. रात्रभर श्रीराम कुटुंबीय मेंढ्या शोधण्यासाठी तळमळ करत होते. अंदाजे १० मेंढ्या व चार शेळ्या फस्त केल्या आहे. परिसरातील रहिवाशांच्या मदतीने जखमी मेंढ्यांवर उपचार करण्यात आले. या घटनेत श्रीराम कुटुंबीयांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी (दि. २७) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कमळूवाडी शिवारात भाऊराव पांडुरंग जाधव हे शेळ्या राखण करत असताना बिबट्याने त्यांची एक शेळी फस्त केली आहे. या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने दहशत निर्माण झाली आहे. (वार्ताहर)
पिंजरा लावण्याची मागणी
भोजापूर परिसर हा डोंगराळ भाग असल्याने या भागात नेहमी बिबट्याचा वावर असतो. भक्ष्य शोधण्यासाठी बिबट्या नेहमी हल्ले करत असतो. त्यामुळे वाड्या-वस्त्यांवर तसेच शेतात काम करण्यास मजूर तथा महिला धजावत नाही. या परिसरात नेहमी असे प्रकार घडत असतात. वनविभागसुद्धा याबाबत पाहिजे त्या प्रमाणात लक्ष देत नाही. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी जगन पाटील भाबड, ग्रामपंचायत सदस्य कचरू यादव खैरनार, परशराम भाबड, नवनाथ खैरनार, आनंदा जाधव आदिंसह ग्रामस्थांनी केली आहे.