जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची चारशे पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:15 AM2021-02-10T04:15:24+5:302021-02-10T04:15:24+5:30
नाशिक जिल्ह्यात पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांची संख्या जवळपास ३२६६ इतक्या असून, त्यासाठी ११६५५ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. ...
नाशिक जिल्ह्यात पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांची संख्या जवळपास ३२६६ इतक्या असून, त्यासाठी ११६५५ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. यात जवळपास सहाशेहून अधिक पदे रिक्त होती. मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी शासनाने सुमारे २४२ शिक्षकांची पदे शासनाने पवित्र पोर्टलद्वारे भरून नाशिक जिल्ह्यासाठी दिले होते. परंतु सुमारे चारशे पदे अद्याप अजून रिक्तच आहेत. कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून केली जाणारी शाळांची पट पडताळणीही होऊ शकलेली नाही. शाळांची पट संख्या निश्चित केल्यानंतर त्याच्या आधारे शिक्षकांची पदे शाळानिहाय निश्चित केली जातात. साधारणत: ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक देण्यात येतो. त्यानंतर मात्र विद्यार्थी संख्येचा आधार घेऊन कमीत कमी एका शाळेला दोन शिक्षक दिले जावेत असा शिक्षण विभागाचा दंडक आहे. गेल्या दोन वर्षांपासून शाळांची पटसंख्या ऑनलाईन भरून त्या आधारे शिक्षकांची पदे मान्यता देण्यात येत असले तरी, यंदा शैक्षणिक सत्रात शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे संचमान्यता न झाल्याने शिक्षकांची संख्या निश्चित होऊ शकली नाही. परिणामी शिक्षकांचे समायोजनही रखडले आहे.
जिल्ह्यात शिक्षकांची चारशे पदे रिक्त असली तरी, अलीकडेच शिक्षण विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यांकडून मंजूर पदे व रिक्त पदांची माहिती मागविली आहे. राज्यातील बीड, परभणी आदी जिल्ह्यात शिक्षकांची अतिरिक्त पदे असल्याने त्यातून शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत.