दहेगावी अपघातात चार ठार; चालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:37 AM2017-12-05T00:37:44+5:302017-12-05T00:42:20+5:30
मनमाड : जमिनीच्या वादातून दहेगाव शिवारात मोटारसायकलला टॅँकरची धडक देऊन चौघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी टॅँकरचालक चुलत भावाविरुद्ध चांदवड पोलिसांनी रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. संतप्त नातेवाइकांनी अंत्यविधी रोखून धरल्यानंतर सकाळी झालेल्या अपघाताचे रूपांतर रात्री खुनामध्ये झाले. मनमाड-मालेगाव रोडवर दहेगाव शिवारात भरधाव टँकरने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार, तर एक जण जखमी झाला आहे. मयतांमध्ये पती-पत्नीसह माय-लेकाचा समावेश आहे. दरम्यान,सदरची घटना अपघात नसून घातपात असल्याचा संशय मृताच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.
मालेगाव रोडवरील दहेगाव शिवारात पाटील पेट्रोलपंपाजवळ मालेगावकडून मनमाडकडे येत असलेल्या होंडा शाईन गाडीला मालेगावकडून भरधाव वेगात आलेल्या टॅँकरने जोरदार धडक दिली. अपघातानंतर टॅँकरचालकाने टॅँकर पेट्रोलपंपासमोर उभा करून घटनास्थळावरून पळ काढला. अपघात इतका भयानक होता की मोटारसायकलचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातामधे संतोष रामभाऊ चितळकर (३५), आशाबाई संतोष चितळकर (३०), भूषण उत्तम चितळकर (१०), सर्व रा. बोयेगाव, ता. नांदगाव हे तिघेजण जागीच ठार झाले, तर गंभीर जखमी सविता उत्तम चितळकर (४०) यांचे मालेगाव येथे उपचार सुरू असताना निधन झाले.
रोशन संतोष चितळकर (१०), रा. बोयेगाव याच्यावर मालेगाव येथे उपचार सुरू आहेत. मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मयतांच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. मालेगाव येथे उपचार सुरू असलेल्या सविता चितळकर यांच्या निधनाची माहिती कळताच नातेवाईकांच्या संतापाचा उद्रेक झाला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.