चौघांनी मोटारीतून येत शेतकऱ्याला मारले ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 03:49 PM2020-05-12T15:49:26+5:302020-05-12T15:56:21+5:30
नाशिक : तालुक्यातील गिरणारे-हरसूल रस्त्यावरील धोंडेगाव शिवारात काश्यपी धरणाच्या जवळ एका रुग्णालयालगत असलेल्या शेतातून परतणारे मोतीराम बेंडकुळे (५५,रा.धोंडेगाव) यांच्यावर ...
नाशिक : तालुक्यातील गिरणारे-हरसूल रस्त्यावरील धोंडेगाव शिवारात काश्यपी धरणाच्या जवळ एका रुग्णालयालगत असलेल्या शेतातून परतणारे मोतीराम बेंडकुळे (५५,रा.धोंडेगाव) यांच्यावर सोमवारी (दि.११) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चौघा अज्ञात हल्लेखोरांनी मोटारीतून येत पत्ता विचारण्याच्या बहाणा करून धारधार शस्त्राने सपासप वार करून ठार मारल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धोंडेगावात राहणारे बेंडकुळे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतावरून घरी परतत होते. यावेळी एका पांढ-या रंगाच्या मोटारीतून आलेल्या चौघांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबविले, यावेळी दुस-याने धारधार शस्त्राने त्यांच्या कमरेवर व छातीवर सपासप वार केले. यामुळे बेंडकुळे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. रात्रीचा अंधार अन् निरव शांततेचा फायदा घेत हल्लेखोर आलेल्या वाहनातून पसार होण्यास यशस्वी ठरले. बेंडकुळे यांचा निघृण खून करण्यामागील नेमके क ारण काय असावे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
हल्लेखोर ज्या वाहनांतून आले, ते वाहन तेथील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले असून त्याअधारे आता पुढील तपासाला हरसूल पोलिसांनी गती दिली आहे. घटनेची माहिती मिळताच हरसूल पोलिस ठाण्याचे सहायक निरिक्षक विशाल टकले हे पोलीस कर्मचाºयांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी पंचनामा पूर्ण करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकिय रूग्णालय नाशिक येथे हलविला.
या अचानकपणे लॉकडाउन काळात घडलेल्या घटनेने धोंडेगाव, देवरगाव पंचक्रोशी हादरली आहे. हल्लेखोर नेमके कोण होते? ते कोणत्या मोटारीतून आले व त्यांनी बेंडकुळे यांना ठार का मारले? अशा एक ना अनेक प्रश्नांची पंचक्रोशीत चर्चा आहे. दरम्यान, बेंडकुळे यांचा नित्यक्रम माहित करुन घेत त्यांच्यावर पाळत ठेवून हल्लेखोरांनी हल्ला केला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. याप्रकरणी हरसूल पोलिसांनी अज्ञात संशयितांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास टकले हे करीत आहेत.