चोंढी घाट अपघातात चार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 01:52 AM2019-02-26T01:52:41+5:302019-02-26T01:52:54+5:30
: मालेगाव - मनमाड मार्गावरील चोंढी घाटाजवळ सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ट्रक - इर्टिगा कार यांच्यातील अपघातात पुणे व नांदेड येथील चार ठार तर चार जण जखमी झाले. मृतांमध्ये सख्ख्या बहिणींसह मुलगा व मुलीचा समावेश आहे.
नाशिक : मालेगाव - मनमाड मार्गावरील चोंढी घाटाजवळ सोमवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास ट्रक - इर्टिगा कार यांच्यातील अपघातात पुणे व नांदेड येथील चार ठार तर चार जण जखमी झाले. मृतांमध्ये सख्ख्या बहिणींसह मुलगा व मुलीचा समावेश आहे.
सविस्तर वृत्त असे, मृत्युंजयसिंह नरेंद्र बहादूरसिंग (३५) मूळ रा. कोबांबी, प्रयागराज (उत्तर प्रदेश) हा पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीस आहे. त्यांचा साडू विजीत सिंह (३०) रा. इतवारा नांदेड हे शालकाच्या लग्नासाठी प्रयागराज (अलाहाबाद) येथे गेले होते. २१ फेब्रुवारी रोजी लग्न समारंभ आटोपून पुणे येथे परत जाताना पहाटे ५ वाजेच्या सुमारास चोंढी घाटाजवळ इर्टिगा कार (क्र. एमएच ११ बीएच ६७४६) ही मनमाडहून मालेगावकडे येणाऱ्या ट्रकवर (क्र. एमएच १८ एए १३७७) आदळून अपघात झाला. यात अंजुसिंह विजीतसिंह परमार (२८), मुलगा वीरेंद्रसिंह विजीतसिंह परमार (७) रा. इतवारा नांदेड, शालीनी मृत्युंजयसिंह (३०) व मुलगी रिद्धीसिंह मृत्युंजयसिंह (६) रा. हल्ली पुणे यांचा या अपघातात मृत्यू झाला.
अपघाताच्या या घटनेत विजीतसिंह परमार (३५), वंश विजीतसिंह (दीड वर्ष) रा. नांदेड, मृत्युंजयसिंह नरेंद्रबहादूरसिंह (३०), रितसिंह मृत्युंजयसिंह (५) गंभीर जखमी झाले. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तालुका पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत उपचारार्थ जखमींना खाजगी रुग्णालयात केले. अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याने अपघातग्रस्त वाहनांना क्रेनच्या सहाय्याने बाजुला करीत वाहतूक सुरळीत करण्यात आली. मृतांचे सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन शव नातलगांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक हिरे करीत आहेत.