वाहनचालकाशी वाद घालत चार लाख लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2022 01:07 AM2022-07-09T01:07:43+5:302022-07-09T01:08:01+5:30
नाशिक-औरंगाबाद मार्गावर वर्दळीच्या ठिकाणी अज्ञात इसमांनी गाडीला कट का मारला याबाबत वाद घालत अल्टो कार मालकाचे लक्ष विचलित करीत वाहनातून चार लाख रुपये लंपास करण्याची घटना गुरुवारी (दि. ७) घडली. या घटनेने निफाड शहरात खळबळ उडाली आहे.
निफाड : नाशिक-औरंगाबाद मार्गावर वर्दळीच्या ठिकाणी अज्ञात इसमांनी गाडीला कट का मारला याबाबत वाद घालत अल्टो कार मालकाचे लक्ष विचलित करीत वाहनातून चार लाख रुपये लंपास करण्याची घटना गुरुवारी (दि. ७) घडली. या घटनेने निफाड शहरात खळबळ उडाली आहे.
निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तारुखेडले येथील राहणारे प्राथमिक शिक्षक संजय रामनाथ गवळी हे गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या आपल्या अल्टो कारने (एमएच १५ डी सी ५०८२) निफाड येथे स्टेट बँकेतून पैसे काढण्यासाठी आले. त्यांनी बँकेतून ४ लाख रुपये काढले व गाडीत पुढील सीटवर निळ्या रंगाच्या कापडी पिशवीत ठेवले. सदर पैसे आपल्या मित्राला देण्यासाठी ते निघाले. त्यांची गाडी लक्ष्मी पेट्रोल पंपासमोर आली असता २ इसम काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर गवळी यांच्या गाडीच्या डाव्या बाजूने आले. त्यातील चालकाने हेल्मेट घातलेले होते. या इसमांनी गवळी यांच्या गाडीला हात मारला. त्यानंतर गवळी यांनी गाडीची डाव्या बाजूची काच खाली केली असता आमच्या गाडीला कट का मारला असा वाद ते इसम घालू लागले. गवळी यांनी आपली गाडी रस्त्याच्या दुभाजकाजवळ उभी केली व आपण गाडीला कट मारलेला नाही हे समजून सांगू लागले. हा प्रकार चालू असताना गाडीच्या डाव्या बाजूची काच उघडी होती. त्यानंतर गवळी यांनी आपली गाडी रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या एचडीएफसी बँकेच्या समोर लावण्यासाठी नेली असता त्यांना सीटवर ठेवलेली पैशाची पिशवी नसल्याचे लक्षात आले. या वेळी अज्ञात चोरटे निफाड शहराकडे वेगाने जात असल्याचे दिसले. गवळी यांनी तातडीने आपल्या वाहनातून या अज्ञात इसमांचा पाठलाग केला, मात्र चोरटे नाशिक बाजूकडे फरार होण्यात यशस्वी झाले. सदर घटना तातडीने निफाड पोलिसांना कळवण्यात आली. एवढ्या मोठ्या स्वरूपात रोख रक्कम लंपास करण्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी माळी अधिक तपास करीत आहे.