नांदगाव सदो शिवारात आढळली बिबट्याची चार बछडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 02:47 PM2020-08-17T14:47:23+5:302020-08-17T14:47:55+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो शिवारातील जंगल परिसरातील एका पडक्या झोपडीच्या पडवीत १५ दिवस वयाची चार बिबट्याची बछडे आढळून आली. दरम्यान जंगल परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसापासून बचावासाठी मादी बिबट्याने आपली पिले या झोपडीत आणून ठेवली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो शिवारातील जंगल परिसरातील एका पडक्या झोपडीच्या पडवीत १५ दिवस वयाची चार बिबट्याची बछडे आढळून आली. दरम्यान जंगल परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसापासून बचावासाठी मादी बिबट्याने आपली पिले या झोपडीत आणून ठेवली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मादी बिबट्या येऊन या बछड्यांना सुरक्षित स्थळी घेऊन जाईल. मात्र या झोपडीकडे कोणी नागरिकांनी जाऊ नये यासाठी वनविभागाचे कमर्चारी तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकाराची माहिती समजताच परिसरातील नागरिक या भागाकडे येण्यासाठी धाव घेत आहेत मात्र या झोपडीजवळ कोणालाही जाऊ दिले जात नाही. इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो शिवाराच्या जंगल परिसरात दूरवर एक निर्जनस्थळी शेतात झोपडीवजा पडवी आहे. या ठिकाणी सध्या कोणीही राहत नाही. दरम्यान सामेवारी सायंकाळच्या सुमारास एका बिबट्या मादीने आपली चार बछडे या झोपडीत सुरक्षित स्थळी आणून ठेवली. सकाळी आपल्या या चारही पिलांना सुरक्षित ठेऊन बिबट्या शिकारीसाठी जंगलात गेली.
मात्र आज सकाळी ही बाब समजताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याची बछडे सुरक्षित असल्याची खात्री केली व बछड्यांसाठी मादी बिबट्या पुन्हा या ठिकाणी येऊन आपल्या पिलांना दुसऱ्या सुरक्षित स्थळी घेऊन जाईल असा वनविभागाचा अंदाज आहे. त्यामुळे याठिकाणी तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदशर्नाखाली वनविभागाचे पथक याठिकाणी पहारा देत आहेत. (१७ घोटी १)