चार महिने अगोदरच बिहारला जाणाऱ्या रेल्वे ‘हाउसफुल
By admin | Published: June 23, 2017 12:02 AM2017-06-23T00:02:48+5:302017-06-23T00:12:02+5:30
नाशिकरोड : छट पूजेमुळे १२० दिवस अगोदरच गुरुवारी सकाळी काही मिनिटांतच मुंबईहून बिहारला जाणाऱ्या चारही रेल्वेचे आरक्षण हाउसफुल झाले.
’लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : चार महिन्यांनंतर दिवाळी सणापाठोपाठ येणाऱ्या छट पूजेमुळे १२० दिवस अगोदरच गुरुवारी सकाळी काही मिनिटांतच मुंबईहून बिहारला जाणाऱ्या चारही रेल्वेचे आरक्षण हाउसफुल झाले.
रेल्वे प्रशासनाकडून १२० दिवस अगोदर रेल्वे आरक्षण काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्याच्या सोमवारी दिवाळी सणास प्रारंभ होत असून, १९ आॅक्टोबरला लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मी पूजनानंतर सहा दिवसांनी उत्तर भारतीय तीन दिवस छटपूजा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. येत्या २४ ते २७ आॅक्टोबरदरम्यान छटपूजेचा मुहूर्त आहे. विशेष करून मुंबई-ठाणे भागात व नाशिकमध्येदेखील उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.
रेल्वेचे आरक्षण १२० दिवस अगोदर काढता येत असल्याने गुरुवारी सकाळी ८ वाजता रेल्वे आरक्षण कार्यालय उघडताच २० आॅक्टोबरच्या रेल्वेचे आरक्षण काढता येणार होते. गुरुवारी सकाळी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर काही मिनिटांतच मुंबईहून बिहारला जाणाऱ्या पवन, भागलपूर, पटना व पाटलीपुत्र एक्स्प्रेस या चारही गाड्यांचे आरक्षण हाउसफुल झाले.