क्षणात चौघे चिमुकले झाले अनाथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:38 AM2019-04-05T00:38:08+5:302019-04-05T00:38:40+5:30
ओझर : सय्यद पिंप्रीत बुधवारी वराडे कुटुंबातील तिघांवर काळाने घाला घातला आणि नंदू व सविता वराडेंचं कुटुंबच पोरकं झालं. त्यांचे चुलत पुतणे केशव वराडे हे शेजारीच गाडी धूत असताना हा प्रकार त्यांच्या डोळ्यादेखत होत होता. काका-काकूंना वाचविण्यासाठी त्यानेदेखील पाण्यात उडी मारली आणि काही क्षणात तो देखील गाळात फसला.
सुदर्शन सारडा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ओझर : सय्यद पिंप्रीत बुधवारी वराडे कुटुंबातील तिघांवर काळाने घाला घातला आणि नंदू व सविता वराडेंचं कुटुंबच पोरकं झालं. त्यांचे चुलत पुतणे केशव वराडे हे शेजारीच गाडी धूत असताना हा प्रकार त्यांच्या डोळ्यादेखत होत होता. काका-काकूंना वाचविण्यासाठी त्यानेदेखील पाण्यात उडी मारली आणि काही क्षणात तो देखील गाळात फसला.
मयत नंदू वराडे व सविता हे दांपत्य किसाननगर परिसरात अल्प शेतीत आपला प्रपंच चालवित होते. गुरु वारी सकाळी बैलगाडीत गोधड्या व कपडे टाकत हे दांपत्य खदाणीकडे गेले. नंदू यांनी बैल धुवून बांधून ठेवले, तर शेवटची चादर धूत असताना खाली असलेल्या शेवाळवरून सविता यांचा पाय घसरला. काही मिनिटात नंदू हे पत्नीला वाचविण्यासाठी गेले; परंतु त्यात दोघेही बुडाले. त्यांच्या पश्चात सोनाली, मोनाली, राणी या तीन मुली व एक पाच वर्षाचा मुलगा सार्थक असे चार चिमुकले आहे. सायंकाळी रु ग्णवाहिकेतून मृतदेह घरी न आणता थेट वेशीवर नेण्यात आले. हजारोंचा जनसमुदाय यावेळी शोकसागरात बुडाला. सोनाली आणि मोनाली या आठ व सात वर्षाच्या मुलींनी आपल्या आई-वडिलांना अग्निडाग, देत एकच हंबरडा फोडला तर राणी आणि सार्थक वयाने लहान असल्याने त्यांना नेमकं काय सुरू आहे हे कळत नव्हतं. त्या चारही चिमुकल्यांची परिस्थिती पाहून उपस्थितीतांची मन हेलावली. आईने सकाळी घरात करून ठेवलेला स्वयंपाक तसाच होता. राणी आणि सार्थकला यापुढे घास भरवायला आई नसणार हा विचार करूनच डोळे सुजले होते. भावंडांमध्ये नंदू वराडे हे सर्वात लहान होते. त्यांच्या पश्चात बहीण व दोन ज्येष्ठ बंधू आहेत. त्यातील एक अपंग आहे, तर दुसरे सेवानिवृत्त आहेत. केशव वराडे यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. स्वभावाने सगळ्यांशी हसतखेळत राहणारा केशव लग्नाच्या बोहल्यावर चढण्याच्या आत काळाने त्याला हिरावून नेले. आज ते चार चिमुकले अनाथ झाले आहे.