चार चित्ररथ सहभागी : मर्दानी खेळांनी वेधले लक्ष; शहर परिसरात अनेक ठिकाणी शिवप्रेमींचा मानाचा मुजरा शिवरायांच्या जयजयकारात मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 01:19 AM2018-03-05T01:19:16+5:302018-03-05T01:19:16+5:30
नाशिक : ढोल-ताशांचा गजर, रथांवरील आकर्षक विद्युत रोषणाई आणि मर्दानी खेळ करीत शिवजयंती साजरी करण्यात आली.
नाशिक : ढोल-ताशांचा गजर, रथांवरील आकर्षक विद्युत रोषणाई आणि मर्दानी खेळ करीत शहरातील पारंपरिक मार्गाने शिवजयंती मिरवणूक काढण्यात येऊन शहरात ठिकठिकाणी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. भगव्या पताका आणि ध्वजांनी चौक सजविण्यात आले होते, तर ठिकठिकाणी महाराजांना मानाचा मुजरा करणारे फलक लावण्यात आले होते. सायंकाळी जुने नाशिक येथील पारंपरिक मार्गाने शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ झाला. उपमहापौर प्रथमेश गिते यांच्या हस्ते नारळ फोडून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावरील चित्ररथ सजविण्यात आले होते. एका चित्ररथात शिवाजी महाराजांचा जीवंत देखावा साकारण्यात आला होता. मिरवणुकीत शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ, हिंदू एकता आंदोलन, श्री शनैश्चर युवक समिती आणि समस्त भोई समाज यांच्या वतीने चित्ररथ काढण्यात आले.
यंदा तारखेनुसार शिवजयंती जोरात साजरी झाली. त्यामुळेच की काय यंदा तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीस अवघे चार चित्ररथ सामील झाले होते. यापूर्वी तिथीनुसार साजरी होणाºया शिवजयंतीत मोठ्या प्रमाणात चित्ररथ सहभागी होत असे. परंतु, तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्यास भाजपाने पुढाकार घेतला व त्याचा फटका सेनेला बसल्याची चर्चा मिरवणुकीत होती.