सराफ बाजारात अडकलेल्या चार जणांची सुखरूप सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 03:52 PM2019-08-04T15:52:31+5:302019-08-04T15:54:43+5:30
नाशिक- गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे दोन दिवसांपासून सराफ बाजारात पाणी शिरलेले असून याठिकाणी मिठाईच्या दुकानात असलेल्या चार जणांना दुपारी बोटी नेऊन बाहेर काढण्यात यश आले. सराफ बाजारासारख्या परीसरात प्रथमच बोटींचा वापर करण्यात आला असून आता येथील नागरीकांना पुर कमी होण्याची अपेक्षा आहे.
नाशिक-गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे दोन दिवसांपासून सराफ बाजारात पाणी शिरलेले असून याठिकाणी मिठाईच्या दुकानात असलेल्या चार जणांना दुपारी बोटी नेऊन बाहेर काढण्यात यश आले. सराफ बाजारासारख्या परीसरात प्रथमच बोटींचा वापर करण्यात आला असून आता येथील नागरीकांना पुर कमी होण्याची अपेक्षा आहे.
सराफ बाजार हा पुरतन बाजार असून याचठिकाणी कापडपेठ आणि भांडी बाजार देखील आहे. सराफ बाजारातच सुवर्णकार व्यवसायिकांची लहान मोठी दोनशेहून अधिक दुकाने आहेत. कापड व्यवासायिकांची साठ ते सत्तर आणि भांडी व्यवसायिकांची सुमारे शंभर दुकाने आहेत. २००८ नंतर प्रामुख्याने शहरातील सराफ बाजारात पाणी शिरण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाऊस सुरू असतानाच दोन दिवसात वेग वाढला आणि गंगापूर धरण्यातून पाण्याचा विसर्ग वाढविणार असल्याचे कळताच येथील व्यवसायिकांनी माल अन्यत्र नेऊन ठेवला आहे. रविवारी बहुतांशी भागात पाण्याचे लोट वाहत होते. दुपारी याच भागातील महासागर नामक मिठाई दुकानात चार कर्मचारी अडकले होते. त्यांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी बोटीने बाहेर आणले. सराफ बाजारात बोटीचा प्रथमच वापर करण्यात आला आहे.
दरम्यान, नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे तसेच महापौर रंजन भानसी आणि अन्य अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते गंगामातेचे पुजन करण्यात आले. यावेळी कृष्णा नागरे, राजेंद्र दिंडोरकर, संजय दंडगव्हाळ, राजेंद्र ओढेकर तसेच अमर सोनवणे, काळे आदी व्यवसायिक हजर होते.