चार धरणांतून विसर्ग : गोदेला पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:42 AM2018-07-17T01:42:32+5:302018-07-17T01:42:46+5:30
गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, धरणक्षेत्रातही पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणांच्या साठ्यात कमालीची वाढ झाली आहे.
नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, धरणक्षेत्रातही पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणांच्या साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. गंगापूर धरणात ७५ टक्के जलसाठा झाल्याने तसेच त्र्यंबकेश्वर येथे पाऊस सुरू असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ३४ टक्के साठा झाला असून, त्यातील गंगापूर, दारणा, चणकापूर, पुनंद या चार धरणांतून पाणी सोडण्यात आल्याने प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत नाशिक जिल्ह्णात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे. शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाची तिसऱ्या दिवशीही संततधार कायम असून, रविवारी दिवसभर व रात्रीही कोसळलेल्या पावसाने जिल्ह्णातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांत विक्रमी पाऊस झाल्याने गंगापूर व दारणा धरणात ७५ टक्के जलसाठा झाला असून, भावली धरणही ८० टक्के भरले आहे. गेल्या वर्षीही जुलैच्या पहिल्या आठवड्यात धुवाधार कोसळेल्या पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के जलसाठा झाला होता. यंदा उशिरा पाऊस सुरू होऊनही गंगापूर धरणात ७५ टक्के साठा झाला आहे. त्र्यंबकेश्वर व इगतपुरीच्या धरण क्षेत्रात सोमवारीही पावसाची हजेरी कायम असल्यामुळे धरणाची खबरदारी म्हणून गंगापूर धरणातून सकाळी दहा वाजता ३१४४ क्यूसेक तर दारणा धरणामधून ३७२६ क्यूसेक पाणी सोडण्यात आले, त्यानंतर दुपारनंतर पुन्हा विसर्गात वाढ करण्यात आली. दारणा व गंगापूरमधून पाणी सोडल्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातून ७२१० क्यूसेक पाणी सोडून देण्यात आले तर चणकापूरमधून ५६७, पुनदमधून ११९८ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्णातील अन्य धरणांमध्येही पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरण समूहात ५८ टक्के साठा झाला आहे. तर पालखेड समूहात २५ टक्के, वालदेवी ४४ टक्के, कडवा ४२ टक्के, चणकापूर ४५ टक्के, हरणबारी २३ टक्के पाणी साठले आहे. जिल्ह्णातील सर्व धरणांमध्ये ३४ टक्के साठा झाला आहे. भोजापूर, नाग्यासाक्या, माणिकपुंज ही तिन्ही धरणे कोरडीठाक आहेत.
सतर्कतेचा इशारा
जिल्ह्णातील प्रमुख धरणांमधून पाणी सोडल्याने गोदावरी, दारणा, कादवा, आरम, गिरणा या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून, नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती तसेच आंघोळीसाठीदेखील मुलांनी नदीत उड्या घेण्यास सुरुवात केल्याने प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. धरणक्षेत्रात सध्या पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे प्रसंगी धरणाच्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार असल्यामुळे नदीच्या काठालगत असलेल्या रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.