गावठी कट्ट्यासह चार कोयते अन् दोन तलवारी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:27 AM2021-02-21T04:27:54+5:302021-02-21T04:27:54+5:30
शहरातील गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी पाण्डेय आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. त्यांनी पोलीस उपआयुक्त, सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक ...
शहरातील गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी पाण्डेय आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत. त्यांनी पोलीस उपआयुक्त, सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही परिमंडळांतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार, तडीपार गुन्हेगारांसह विविध गुन्ह्यांत हवे असणारे फरार गुन्हेगारांचे ठावठिकाणे तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. पंधरा ठिकाणी छापेमारीचे सत्र राबविण्यात आले. दरम्यान, पंचवटी, भद्रकाली, उपनगर, नाशिकरोड या पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांनी गोपनीय माहिती घेत बेकायदेशीरपणे स्वत:जवळ शस्त्रे बाळगणाऱ्या संशयितांची माहिती संकलित केली. यानुसार पाण्डेय यांनी त्या संशयितांच्या घरांची झाडाझडती घेण्याचे वॉरंट या पोलीस प्रमुखांना लेखी स्वरूपात देत आयुक्तालयाकडून जादा मनुष्यबळही पुरविले. दरम्यान, सहायक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी घरझडती घेत एकाचवेळी वरील पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पंधरा ठिकाणी छापे टाकले. यावेळी परिमंडळ एकअंतर्गत पाच संशयितांकडून शस्त्रे जप्त करण्यास पोलिसांना यश आले. यामध्ये १ गावठी कट्टा, २ जिवंत काडतुसे, तलवारी, १चाकू, चॉपरसारखे हत्यारे पोलिसांनी जप्त केली. संशयितांविरुध्द शस्त्रबंदी कायदा, विनापरवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
---इन्फो--
या संशयितांवर गुन्हे दाखल
अकबर उर्फ भुऱ्या शेख (रा. खडकाळी, जुने नाशिक), किशोर वाकोळे (रा.कथडा, जुने नाशिक), निखिल उर्फ निक्कु बेग (रा.५४ क्वार्टर वसाहत, कथडा), प्रवीण कुमावत (रा. पोटिंदेचाळ, मखमलाबादरोड), मदन मारुती पवार (रा.नवनाथनगर, पेठरोड), ऋषिकेश अशोक निकम (रा.आंबेडकरनगर, मालधक्का रोड) या संशयित गुन्हेगारांना विनापरवाना शस्त्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल केले. या धडक कारवाईमध्ये १७पोलीस निरीक्षक, ३८ उपनिरीक्षक, २०६ अंमलदार आणि ३५ महिला पोलिसांनी सहभाग घेतला.