सात लघुप्रकल्पांपैकी चार कोरडेठाक

By admin | Published: January 3, 2017 11:22 PM2017-01-03T23:22:54+5:302017-01-03T23:23:29+5:30

आरक्षण : बोरीअंबेदरी, साकूर, झाडी प्रकल्पांमधून पिण्यासाठी पाणी आरक्षित

Four of the seven mini-planes are dry | सात लघुप्रकल्पांपैकी चार कोरडेठाक

सात लघुप्रकल्पांपैकी चार कोरडेठाक

Next

मालेगाव : तालुक्यातील सात लघुप्रकल्पांपैकी केवळ तीनच लघुप्रकल्पांमध्ये जलसाठा शिल्लक आहे, तर चार प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. चणकापूर, गिरणा धरण व स्थानिक पाणीपुरवठा योजनांवरच भविष्यात तालुक्यातील गावांची तहान भागविली जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून मालेगाव तालुका सातत्याने दुष्काळाशी सामना करीत आहे. गेल्यावर्षी तालुक्यात ४३ गाव व वाड्यांना २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता. १९७२ प्रमाणे तालुक्यात पाणीटंचाईने कळस गाठला होता. ४३ ठिकाणी टँकरच्या दररोज ४९ फेऱ्या मारून पाणी पुरविले जात होते. सातही लघुप्रकल्प कोरडेठाक पडले होती. यंदा निसर्गाने साथ दिल्यामुळे सातही प्रकल्पांमध्ये पावसाळ्यात बऱ्यापैकी पाणी होते. यामुळे पाणीटंचाईबरोबरच शेती सिंचनाचा प्रश्नही काही अंशी मार्गी लागला होता. सद्यस्थितीत तालुक्यातील सात लघुप्रकल्पांपैकी दहिकुटे, लुल्ले, अजंग, दुंधे हे चार लघुप्रकल्प कोरडेठाक पडले आहेत, तर झाडी प्रकल्पात ७१ टक्के, साकूर ४१ टक्के, तर बोरीअंबेदरीत ६३ टक्के जलसाठा आहे. या पार्श्वभूमीवर येथील प्रांताधिकारी अजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०१६-१७ या वर्षातील पिण्याच्या पाण्याचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. बोरीअंबेदरी प्रकल्पातून अस्तानेला ५, जळकूला ५, टिंघरीला २, वनपटला २, कंधाणेला २ असे एकूण २६ दलघफू, तर साकूर प्रकल्पातून साकूर गावासाठी एक दलघफू, झाडी प्रकल्पातून झाडी १०, मेहुणे ११, निमगाव ११ असे ३२ दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे या भागातील शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची चिन्हे दिसत नाहीत. तसेच गिरणा व चणकापूर धरणावर तालुक्यातील काही गावांचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच माळमाथा पाणीपुरवठा योजना, २६ गाव पाणीपुरवठा योजना, ५६ खेडी पाणीपुरवठा या योजनांद्वारे तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा केला जातो. स्थानिक ग्रामपंचायतींनीही स्वतंत्रपणे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्या आहेत. भविष्यात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाने पाणी वापराचे काटेकोर नियोजन करणे तसेच धरणातील जलसाठ्याची चोरी होणार नाही याकडेही लक्ष देणे गरजेचे बनले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Four of the seven mini-planes are dry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.