चार विद्यार्थी परीक्षेला मुकले
By admin | Published: May 12, 2017 02:08 AM2017-05-12T02:08:21+5:302017-05-12T02:09:45+5:30
नाशिक : अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र बनावट केल्यामुळे चार विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : बारावीनंतर अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा म्हणजेच सीईटी परीक्षेचे प्रवेशपत्र बनावट तयार केल्यामुळे घोटीच्या चार विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात प्राप्त तक्रारींची खातरजमा केल्यानंतर सायबर कॅफेचालकाकडूनच विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
नितीन मनोज विसपुते, समाधान संतोष वाजे, रक्षा विलास शिंदे, योगेश संपत पोरजे अशा या चार विद्यार्थ्यांची नावे असून, चौघेही घोटी येथील रहिवासी आहेत. त्यांनी सीईटी परीक्षेचा अर्ज आॅनलाइन पद्धतीने गावातीलच सायबर कॅफेमधून दाखल केला होता. त्यांचा अर्ज तंत्रशिक्षण संचालनालयाकडून स्वीकारलाही गेला, परंतु परीक्षेचे शुल्कासाठी चलन भरून त्याची माहिती सादर करताना सायबर कॅफेचालकाने काहीतरी तांत्रिक चूक केल्यामुळे या चौघा विद्यार्थ्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र तयार होऊ शकले नाही.
तथापि, सायबर कॅफेचालकाने बनावट प्रवेशपत्र बनवून दिले. गुरुवारी यातील नितीन विसपुते व समाधान वाजे हे दोघे के. के. वाघ पॉलिटेक्निक महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी गेले तर रक्षा शिंदे ही के. के. वाघ अॅग्रीकल्चर महाविद्यालयात व योगेश पोरजे हा एचटीपी महाविद्यालयात परीक्षा प्रवेशपत्र घेऊन गेले असता परीक्षा हॉलमध्ये त्यांच्या जागेवर अन्य दुसरेच विद्यार्थी बसलेले पाहून या चौघा विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थापकांना विचारणा केली. परीक्षेची वेळ झाल्यामुळे या चौघा विद्यार्थ्यांना पहिल्या पेपरच्या परीक्षेसाठी बसू देण्यात आले. या दरम्यानच्या काळात प्रशासनाने तंत्रशिक्षण संचालनालयाशी संपर्क साधून खात्री केली असता, या विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र बनावट असल्याचे सांगण्यात आले. चौकशीअंती सारी चूक सायबर कॅफेचालकाची असल्याचे उघड झाले.