धामणे खूनप्रकरणी चौघा संशयिताना बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:15 AM2020-12-22T04:15:04+5:302020-12-22T04:15:04+5:30

इगतपुरी येथे शुक्रवारी (दि.१८) रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास जुन्या वादातून कुविख्यात संजय बबन धामणे (रा. देवळालीगाव, नाशिकरोड) याचा ...

Four suspects arrested in Dhamne murder case | धामणे खूनप्रकरणी चौघा संशयिताना बेड्या

धामणे खूनप्रकरणी चौघा संशयिताना बेड्या

googlenewsNext

इगतपुरी येथे शुक्रवारी (दि.१८) रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास जुन्या वादातून कुविख्यात संजय बबन धामणे (रा. देवळालीगाव, नाशिकरोड) याचा धारधार हत्याराने खून करण्यात आला होता. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध इगतपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आशा पॅट्रिक मॅकवेल हिला पोलिसांनी सर्वप्रथम अटक केली आहे. गुन्ह्यातील संशयित सोनू ऊर्फ संजय मोहन राऊत (२३,रा. इगतपुरी) हा रेल्वेने त्याच्या मूळगावी लखनऊ येथे पळून जाणार असल्याची गोपनीय माहिती इगतपुरी गुन्हे शोध पथकाचे सचिन देसले यांना मिळाली. देसले यांनी ही माहिती नाशिकरोड रेल्वे स्थानकातील पोलिसांना कळविली, तसेच मोबाईलवर फोटोही पाठविला. रेल्वे पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक विष्णू भोये, हवालदार संतोष उफाडे, सचिन देसले, महेश सावंत, विलास पंतावने यांनी सोमवारी (दि.२१) दुपारी रेल्वेस्थानकात गस्त सुरू केली. दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास रेल्वेने जाण्यासाठी फलाट क्रमांक-२ वर स्वत:ला प्रवासी भासवून बाकावर बसलेल्या सोनू राऊतला रेल्वे पोलिसांनी ओळखून शिताफीने ताब्यात घेतले. इगतपुरी पोलिसांना ही माहिती दिली. तेथील पोलीस आल्यावर त्यांच्या ताब्यात सोनूला देण्यात आले.

तसेच ग्रामीण पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित पापा ऊर्फ सायमन पॅट्रिक मॅकवेल याला कल्याणमधून तर इगतपुरीतून संशयित राहुल रमेश साळवे आणि विशाल खाडे यास ताब्यात घेतले. सुमारे सहा वर्षांपूर्वी डेविड पॅट्रिक मॅकवेलच्या खुनातील संशयित आरोपी म्हणून राजेश बबन धामणे हा शिक्षा भोगत आहे.

Web Title: Four suspects arrested in Dhamne murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.