चार हजार शेतकरी मका पीकविम्यापासून वंचित
By admin | Published: July 18, 2016 12:05 AM2016-07-18T00:05:13+5:302016-07-18T00:47:54+5:30
दादा भुसे यांनी प्रश्न सोडवावा : येवल्याच्या शिष्टमंडळाचे मंत्र्यांना साकडे
येवला : राष्ट्रीय कृषी विमा योजने अंतर्गत तालुक्यातील सुमारे चार हजार शेतकऱ्यांनी दोन हजार आठशे तेरा हेक्टर मका पिकासाठी १५ लाख २४ हजार ५८४ रुपयांचा विमा हप्ता मुदतीत भरला असूनही संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना साडेसहा कोटी रुपयांच्या विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले आहे. लाभ देण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिले.
तालुका शिवसेनेच्या वतीने भुसे यांचा सत्कार करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाने चांदवड येथील शासकीय विश्रामगृहावर त्यांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे पवार यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल शेलार, शिवसेना तालुकाप्रमुख झुंजार देशमुख, वाल्मिक गोरे, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, रतन बोरणारे, भास्कर कोंढरे, पुंडलिक पाचपुते, जगन बोराडे, अरुण काळे, शरद लहरे, प्रमोद पाटील, दत्ता आहेर, जनार्दन खिल्लारे, दिलीप मेंगाळ, शिवाजी धनगे, भास्कर येवले, शरद पवार, कोतीलाल साळवे, साहेबराव सैद, विठ्ठल आठशेरे, मनोहर जावळे, पुंजाराम काळे, धिरज परदेशी, नंदू झांबरे, सुदाम सौंदाणे, प्रकाश साताळकर, विकास निकम, रवि काळे, बी. एन. सोनवणे यांच्या शिष्टमंडळाने भुसे यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे, मका पीकविम्यापासून येवला तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना साडेसहा कोटी रुपयांचा लाभ मिळवून देणे महत्त्वाचे आहे. तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पालखेड डाव्या कालव्याच्या पूर पाण्यातून तालुक्यातील सर्व बंधारे भरून द्यावेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याची समस्या काही प्रमाणात दूर होईल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
भुसे यावेळी म्हणाले, सहकार राज्यमंत्री असताना कागदावरच्या संस्था बंद करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला. सहकारातल्या अनेक समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न असतो. कष्टकरी माणूस खात्याचा केंद्रबिंदू असून त्याला स्वच्छ पाणी, आरोग्य व दर्जेदार शिक्षण मिळावे या त्रिसूत्रीवर आधारित काम करणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.