वनरक्षकांवरील हल्ल्याप्रकरणी चौघा गावकऱ्यांना बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 01:56 AM2022-05-12T01:56:25+5:302022-05-12T01:56:41+5:30
सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रातील उंबरपाडा गावालगत डोंगरावर मंगळवारी (दि. ९) रात्रीच्या सुमारास खैराची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या चार वनरक्षकांवर गावातील काही संशयितांनी हल्ला चढविला. दगड, लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याने चौघे वनरक्षक गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सुरगाणा पोलिसांकडून माजी सरपंचासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
नाशिक : सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रातील उंबरपाडा गावालगत डोंगरावर मंगळवारी (दि. ९) रात्रीच्या सुमारास खैराची तस्करी रोखण्यासाठी गेलेल्या चार वनरक्षकांवर गावातील काही संशयितांनी हल्ला चढविला. दगड, लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याने चौघे वनरक्षक गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सुरगाणा पोलिसांकडून माजी सरपंचासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, उंबरपाडा गावालगत फिर्यादी वनरक्षक रामजी मधुकर कुवर (वय २९, रा. केळीपाडा, सुरगाणा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुख्य संशयित माजी सरपंच लालजी हरी टोपले (४०, ), ज्ञानेश्वर हरी गावीत (४६), सावळीराम तुळशीराम गावीत (४९), कमळाकर सीताराम चव्हाण (३५, रा. सर्व उंबरपाडा) यांना शासकीय नोकरांवर हल्ला केल्याप्रकरणी तसेच शासकीय कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त केल्यामुळे अटक करण्यात आली आहे. या चौघांनी मिळून वनरक्षकांच्या दुचाकीचे (एम.एच १५ एफजी २८१६) नुकसान केले तसेच वनरक्षक कुवर व त्यांच्या तिघा साथीदार वनरक्षकांना धरून दगड, लाठ्यांनी बेदम मारहाण करत जखमी केले, असे कुवर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी सरकारी नोकरांवर हल्ला व दुखापत केल्याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. चौघा जखमी वनरक्षकांवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच लालजी टोपले यांनीही वनरक्षकांविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून वनरक्षकांवर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित वनरक्षकांनी लाकडी काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. टोपले हेदेखील पोलिसांच्या अटकेत असून, ते जखमी झाल्याने त्यांच्यावर सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
---इन्फो--
वनरक्षकांचा पोलीस घेणार जबाब
फिर्यादी कुवर यांच्यासोबत असलेले व मारहाणीत जखमी झालेले अक्षय पाडवी, हिरामण थविल, जे. जे. रामचौरे यांचाही सुरगाणा पोलिसांकडून बुधवारी (दि. ११) जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. त्यांच्या जबाबानुसार या गुन्ह्यात हल्लेखोरांसोबत असलेले अजून काही संशयित, त्यांच्या साथीदारांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे.
--इन्फो--
प्रधान मुख्य वनसंरक्षकांचे वेधले लक्ष
राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. एन रामबाबू (वनबल प्रमुख) यांचेही या वनरक्षकांवरील हल्ल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. राज्याच्या वनरक्षक व पोदन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष अजय पाटील यांनी नागपूर येथे वन भवनात त्यांची भेट घेत निवेदन दिले आहे.