चार गावे टँकरच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:45 AM2018-06-15T00:45:06+5:302018-06-15T00:45:06+5:30
मालेगाव : येथील तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील एरंडगाव, नगाव, सावकारवाडी, निंबायती येथील टँकरचे प्रस्ताव मंजूर झाले नसल्याने या गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ बसत आहे.
मालेगाव : येथील तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील एरंडगाव, नगाव, सावकारवाडी, निंबायती येथील टँकरचे प्रस्ताव मंजूर झाले नसल्याने या गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ बसत आहे.
तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. स्थानिक ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना कोलमडून पडल्या आहेत. तालुक्यातील एरंडगाव, नगाव, सावकारवाडी, निंबायती आदी ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. एरंडगाव ग्रामपंचायतीने २३ मे रोजी तर नगाव, सावकारवाडी ग्रामपंचायतीने २४ मे रोजी टँकर मागणीचा प्रस्ताव येथील पंचायत समितीकडे सादर केला होता. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी ३० मे रोजी संयुक्त पाहणी केली होती. पाहणीनंतर सदर प्रस्ताव १२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले.
तब्बल १२ दिवस प्रस्ताव धूळ खात पडून राहिले. तसेच निंबायती येथील ग्रामपंचायतीने ६ जून रोजी टँकरचा प्रस्ताव सादर केला आहे. ८ जून रोजी संयुक्त पाहणी करण्यात आली. या चारही गावांना अद्यापही टँकरचे पाणी उपलब्ध झाले नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पाणीटंचाईचे गांभीर्य येथील स्थानिक यंत्रणेला नसून वेळ काढूपणाचे धोरण राबविले जात आहे. तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रस्तावांचा प्रवास लांबल्यामुळे टँकर उपलब्ध होऊ शकले नाही. ही बाब गंभीर आहे.
- विनोद शेलार,
रायुकाँ नेते