चौपदरीकरण : चांदवड-मनमाड-नांदगाव-चाळीसगाव-जळगावपर्यंतचा प्रवास होणार सुलभ चांदवड-जळगाव रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात हस्तांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:35 AM2017-12-16T00:35:40+5:302017-12-16T00:36:20+5:30
जळगाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्गाच्या डीपीआरला (सविस्तर प्रकल्प अहवाल) केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
नांदगाव : जळगाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्गाच्या डीपीआरला (सविस्तर प्रकल्प अहवाल) केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या महामार्गाची लवकरच निविदा प्रक्रिया होऊन या कामाला गती मिळणार आहे. सुरुवातीला जळगाव ते नांदगावपर्यंतच्या तीन टप्प्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्यामुळे जळगाव व नाशिकला जाणे येणे सुलभ होणार आहे. यासाठी ५९७ कोटीचा खर्च अपेक्षित आहे, अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे.
चाळीसगाव ते जळगाव या राज्य मार्ग क्रमांक १९चे रूपांतर आता राष्ट्रीय महामार्ग जे ७५३मध्ये झाले आहे. तसे राजपत्रही घोषित करण्यात आले आहे. चाळीसगाव, नांदगाव, मनमाड ते चांदवडपर्यंत हा महामार्ग असणार आहे. यांची लांबी साधारणपणे २०० किलोमीटर आहे. चांदवड ते जळगाव या दोनशे किलोमीटर रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात हस्तांतरण झाल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा रस्ता चौपदरी करण्याच्या दृष्टीने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. सुरुवातीला जळगाव ते भडगाव व भडगाव ते चाळीसगाव या १०३ किलोमीटर अंतराच्या दोन टप्प्याचा डीपीआर मंजुरीसाठी केंद्राकडून पाठविण्यात आला होता. त्यानंतर चाळीसगाव ते नांदगाव हा ४४ किलोमीटर अंतराचा तिसरा टप्प्याचा डीपीआर तयार करण्यात आला. या डीपीआरलादेखील मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबतचे अधिकृत आदेश लवकरच निघण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे रस्ता बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तर नांदगाव ते चांदवड या चौथ्या टप्प्याचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. जळगाव ते भडगाव या ५६ किलोमीटरच्या अंतरासाठी २४१ कोटी, भडगाव ते चाळीसगाव ४६ किलोमीटर साठी २१४ कोटी तर चाळीसगाव ते नांदगाव या ४४ किलोमीटसाठी १६८ कोटी खर्च अपेक्षित आहे. डीपीआरच्या अंतिम मंजुरीनंतर याची निविदा प्रक्रि या पार पडेल त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरु वात होईल.
असा असेल राष्ट्रीय महामार्ग चांदवड ते जळगाव हा दोनशे किलोमीटरचा मार्ग असून, त्याची रुंदी दहा मीटर असणार आहे. प्रत्येकी पाच मीटरचे जाण्या-येण्याचे मार्ग असणार आहे. हा महामार्ग बीओटी (बांधा वापरा व हस्तांतरित) तत्त्वावर असेल. चाळीसगाव ते जळगाव या दरम्यान एकूण नऊ ठिकाणी या रस्त्याला बायपास राहतील. या महामार्गाचे जळगाव ते भडगाव हे अंतर ५६:२ किलोमीटर, भडगाव ते चाळीसगाव ४६:८ किलोमीटर व चाळीसगाव ते नांदगाव ४४ किलोमीटर अंतर आहे.
जळगाव, नाशिक जाणे होईल सुकर
जळगाव जिल्ह्याचा चाळीसगाव हा शेवटचा तालुका. दोघांचे अंतर शंभर किलोमीटरपर्यंत. चाळीसगावच्या व्यक्तीला जळगाव बसने जायचे म्हटले तर तीन तास लागतात. मात्र राज्य महामार्ग क्र मांक एकोणावीस आता राष्ट्रीय महामार्ग झाल्याने वेग वाढण्यास मदत होणार आहे, तर नाशिक, मुंबईला जाणेही सोयीचे होणार आहे. याशिवाय या भागाच्या औद्योगिक विकासाला यामुळे चालना मिळण्यास मदत होऊ शकणार आहे.