टीडीआर घोटाळ्याच्या अहवालासाठी चार आठवड्यांचा वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 12:16 AM2021-12-27T00:16:33+5:302021-12-27T00:17:45+5:30
देवळाली परिसरातील शंभर कोटींच्या टीडीआर घाेटाळा विधानसभेत गाजला. त्यानंतर महापालिकेने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला जाग आली आहे. याबाबतच अहवाल सादर करण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे चार आठवड्यांचा वेळ मागीतला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर याबाबतचा चौकशी अहवाल प्रलंबित असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
नाशिक : देवळाली परिसरातील शंभर कोटींच्या टीडीआर घाेटाळा विधानसभेत गाजला. त्यानंतर महापालिकेने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीला जाग आली आहे. याबाबतच अहवाल सादर करण्यासाठी महापालिकेने राज्य सरकारकडे चार आठवड्यांचा वेळ मागीतला आहे. याप्रकरणी शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर याबाबतचा चौकशी अहवाल प्रलंबित असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
देवळाली शिवारातील सर्वे नंबर २९५/१ मधील शंभर कोटींच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशीला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी गती दिली आहे. बिटको चौक ते रेल्वे पुलादरम्यान २५ हजार १०० रुपये प्रतिचौरस दर तर पुलाच्या पलिकडे शिंदे गावापर्यंतच्या अंतर्गत भागातील दर ६ हजार १०० रुपये प्रतिचौरस मीटर दर्शविण्यात आला आहे. रेडीरेकनर प्रमाणे विभाग क्रमांकही दर्शविलेले असताना त्या अनुषंगाने चौकशी करण्याऐवजी रेडीरेकनरच्या दरांची खात्री करण्यासाठी नोंदणी महानिरीक्षकांकडे पत्रव्यवहार केला जात असल्याची उत्तरे देण्यात आली. शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी स्थायी समितीत हा विषय उचलून धरल्यानंतर खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा समिती स्थापन करण्यात आली. मात्र समिती अद्याप निर्णयापर्यंत पोहचलेली नाही. याप्रकरणी माजी नगरसेवक शिवाजी सहाणे व नगरसेवक सलीम शेख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.