धोंडेगाव : ‘त्या’ शेतकऱ्याच्या खूनप्रकरणी चौघांना बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:48 PM2020-05-21T17:48:26+5:302020-05-21T17:53:09+5:30
धोंडेगाव शिवारातील एका उपचार केंद्राच्या सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज तपासले असता त्यामध्ये त्यांना गुन्ह्यातील पांढ-या रंगाची कार आढळून आली.
नाशिक : दहा ते बारा दिवसांपुर्वी हरसूल पोलीस ठाणे हद्दीतील धोंडेगाव शिवारात रात्रीच्यावेळी पांढºया रंगाच्या मोटारीतून आलेल्या हल्लेखोरांना धारधार शस्त्राने हल्ला चढवून एका शेतक-यास ठार मारले होते. या खूनाच्या घटनेतील संशयित चौघा हल्लेखोरांच्या ग्रामिण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या.
कर्जदाराचा पत्ता न सांगितल्याने मखमलाबाद येथील सावकारासह दिंडारी तालुक्यातील उमराळे येथील त्याच्या तीन साथीदारांनी मनात राग धरून सोमवारी (दि.११) रात्री आठ वाजेच्या सुमारास शेतकरी मोतीराम वामन बेंडकोळी (५५,रा. धोंडेगाव) यांचा निघृण खून केला होता. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्याच आलेल्या चौघांनी खूनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
संशयित हिरामण काशिनाथ धात्रक (४३, रा. उमराळे), गणेश दत्तात्रय मानकर (४३, रा.मखमलाबाद), रामनाथ बबन शिंदे (३३, रा, उमराळे बु.) आणि विकास उर्फ कृष्णा शिवाजी धात्रक (३०, रा. उमराळे ) अशी अटक करण्यात आलेल्या संशियतांची नावे आहेत. ११ मे रोजी रात्री शेतातून घराकडे परतत असताना वरील संशयित हल्लेखोरांनी वाट अडवून मोतीराम यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. ही बाब मंगळवारी (दि.१२) सकाळी उघडकीस आली होती. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी या खूनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक के.के.पाटील, सहा.निरिक्षक स्वप्नील राजपुत, उपनिरिक्षक रामभाऊ मुंढे, रवींद्र शिलावट, हनुमंत महाले, दत्तात्रय साबळे, हेमंत गिलबिले आदिंच्या पथकाने घटनास्थळ गाठले आणि तपासाला गती देत मिळालेल धागेदोऱ्यांवरून उमराळे येथून पहिल्यांदा हिरामण धात्रक यास स्विफ्टच्या (एम.एच.१५ डीएस९१७८) संशयावरून ताब्यात घेतले आणि पुढे खूनाचा उलगडा झाला. धात्रक याने फायनान्स कंपनीचे हप्ते थकविल्यामुळे कंपनी वाहन उचलून घेउन जाईल या भीतीपोटी तो बनावट वाहनक्रमांक वाहनाला लावून वाहन वापरत होता. त्याने एम.एच१५ डीएम ५००९ या क्रमांकाची नंबरप्लेट स्विफ्टवर लावली होती. या बनावट क्रमांकावरूनच पोलिसांचा संशय अधिक बळावला.
सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोरांचा काढला माग
धोंडेगाव शिवारातील एका उपचार केंद्राच्या सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज तपासले असता त्यामध्ये त्यांना गुन्ह्यातील पांढ-या रंगाची कार आढळून आली. या सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांनी तपासाला गती दिली. या चौघा संशयितांनी पांढºया रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून धोंडेगाव गाठले. येथील जाखनमळा पाट रस्ता परिसरात बेंडकोळी यांना एका व्यक्तीचा पत्ता विचारला यावेळी त्यांनी पत्ता सांगण्यास नकार दिल्याने चौघांनी धारधार सुºयाने त्यांच्यावर सपासप वार केले. यामुळे बेंडकोळी रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यानंतर हल्लेखोर स्विफ्ट कारमधून पळून गेले होते.