ट्रकवर चारचाकी आदळून नातवंडासह मायलेक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:11 PM2020-01-22T12:11:57+5:302020-01-22T12:12:54+5:30
या अपघातात नीता शहा (४४), संजना शहा (२८) आणि विद्या थोरात (६५) असे तिघे ठार तर सागर उत्तमचंद शहा (५८) व सावत शहा (३०) असे दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : आडगाव शिवारातील शेर-ए-पंजाब ढाब्या समोर असलेल्या रस्त्यावर समोर जाणाऱ्या अज्ञात ट्रकचालकाने ब्रेक लावून रस्त्यात गाडी थांबवल्यामुळे पाठीमागून येणा-या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी मालट्रकवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघा मायलेकांचा मृत्यू झाला तर दोघे जण जखमी झाले आहेत. मृत झालेले दोघी पुणे तर एक महिला नाशिकची रहिवासी आहे. पुणे येथील शहा कुटुंबिय सोमवार (दि. २१) मालेगाव येथे साडूच्या मुलीचा लग्नसोहळा आटोपून नाशिकला परतताना रात्री एक वाजता हा अपघात घडला.
या अपघातात नीता शहा (४४), संजना शहा (२८) आणि विद्या थोरात (६५) असे तिघे ठार तर सागर उत्तमचंद शहा (५८) व सावत शहा (३०) असे दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की पुणे जिल्ह्यातील एरडवणा येथील रहिवासी असलेले सागर शहा हे रविवारी पत्नी नीता, मुलगी संजना, मुलगा सावत व सासू विद्या थोरात यांच्यासमवेत करोला गाडीतून क्रमांक (एम एच १४ एक्स ६३०१) मालेगाव येथे राहणारे साडू संजय दुसाने यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला गेले होते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर शहा कुटुंबीय पुन्हा नाशिकला येण्यासाठी निघाले. रात्री एक वाजेच्या सुमारास आडगाव शिवारातील शेर-ए-पंजाब ढाब्यासमोर असलेल्या महामार्गावरून शहा हे करेला चारचाकीतून येत असताना पुढे धावणा-या एका अज्ञात मालट्रक चालकाने ब्रेक मारला व मालट्रक अचानक पुढे थांबली त्यातच चालक शहा यांचे नियंत्रण सुटल्याने त्यांची कार ट्रक वर जाऊन पाठीमागून आदळली. या अपघातात शहा यांची पत्नी नीता शहा, मुलगी संजना शहा, सासु विद्या थोरात यांना गंभीर मार लागल्याने त्यांना तत्काळ उपचारार्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली तर स्वत: शहा व मुलगा सावत असे दोघे जखमी झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी कारचा अक्षरश: चिंधडया झाल्या आहे याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बिडकर तपास करीत आहे.