अंबोली शिवारात अवैध मद्यासह चारचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:32 AM2020-12-12T04:32:04+5:302020-12-12T04:32:04+5:30
नाशिक : अवैध मद्य विक्री व वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेंतर्गत आंबोली शिवारात शुक्रवारी (दि. ...
नाशिक : अवैध मद्य विक्री व वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेंतर्गत आंबोली शिवारात शुक्रवारी (दि. ११) पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या कारवाईत अवैध मद्यासह ९ लाख १५ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक मधुकर राख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून भरारी पथकाने शुक्रवारी (दि. ११) पहाटेच्या सुमारास नाशिक जव्हार रोडवर त्र्यंबकेश्वर तालुक्यात अंबोली फाटा शिवारात एका चारचाकी कारमध्ये (जी.जे-१५ सीए-६८६३) केवळ दादरा-नगर हवेली या ठिकाणी विक्रीसाठी परवानगी असलेले तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले वेगवेगळ्या कंपन्यांचे विदेशी मद्य ३१ प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये आढळून आले. त्याचप्रमाणे २१६ बाटल्या, व्हिस्कीच्या ७५० मिलीलिटर क्षमतेच्या ३६ प्लॅस्टिक पिशव्या, १५०० मि.ली. क्षमतेच्या ६० प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्या. या प्रकरणी संशयित प्रियंक बिपीनभाई पटेल (३०, रा. सुरत) यास ताब्यात घेण्यात आले आहे. मद्यसाठ्यासह चारचाकी वाहन असा एकूण ९ लाख १५ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भरारी पथकातील निरीक्षक मधुकर राख, दुय्यम निरीक्षक अरुण सूत्रावे, दुय्यम निरीक्षक राम सुपेकर, सहायक दुय्यम निरीक्षक हेमंत नेहरे, जवान सर्वश्री श्याम पानसरे, धनराज पवार, वीजेंद्र चव्हाण व अनिता भांड यांच्या पथकाने ही कारवाई पूर्ण केली. अधिक तपास निरीक्षक मधुकर राख करीत आहेत.
(फोटो-११पीएचडीसी६९)