चारचाकीतून होणारी शस्त्रांची वाहतूक रोखली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 12:40 AM2020-12-02T00:40:35+5:302020-12-02T00:41:14+5:30
कारमध्ये धारदार शस्त्रे बागळणाऱ्या एका युवकास गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने म्हसरुळ शिवारात बेड्या ठाेकल्या आहेत. त्याच्या चारचाकीमधून गुप्ती, तलवार, चॉपरसारखे घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
नाशिक : कारमध्ये धारदार शस्त्रे बागळणाऱ्या एका युवकास गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने म्हसरुळ शिवारात बेड्या ठाेकल्या आहेत. त्याच्या चारचाकीमधून गुप्ती, तलवार, चॉपरसारखे घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. एका कारमधून अवैधरीत्या शस्त्रे वाहतूक केली जाणार असल्याची माहिती हवालदार नाझीम पठाण यांना समजली. त्यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना याबाबत माहिती दिली. वाघ यांनी पथक तयार करून सापळा रचण्याचे आदेश दिले. यानुसार म्हसरुळ शिवारात साध्या वेशातील पोलिसांनी सापळा रचला. यावेळी संशयास्पद काळ्या रंगाची कार (एमएच ४८ पी २२९५) आली; मात्र कारच्या पाठीमागे पोलीस वाहन पाठलाग करत असल्याचे कारचालकाच्या लक्षात आले. यावेळी त्याने वेगाने कार चालवित निसटण्याचा प्रयत्न केला; मात्र दबा धरुन असलेल्या दुसऱ्या पथकाने शिताफीने त्यांची कार रोखली. यावेळी कारचालक गणेश प्रभाकर ढापसे (रा. वेदांत रेसिडेन्सी, मखमलाबाद) याची झडती घेतली असता, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या कारसह चॉपर, तलवार असा एकूण ३ लाख १ हजार ३०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यावेळी त्याच्या कमरेला एक धारधार चॉपर लावलेला आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. संशयित ढापसेवर म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवींद्र बागुल, विशाल काठे, आसिफ तांबोळी, फय्याज सय्यद, मुख्तार शेख, प्रतिभा पोखरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.