गंगापूररोडला चारचाकी वाहनचालकांचा धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:58 AM2019-06-25T00:58:27+5:302019-06-25T00:58:47+5:30
गंगापूररोड, कॉलेजरोड भागात चारचाकी व दुचाकी वाहनचालकांनी गेल्या काही दिवसांपासून धुडगूस घालणे सुरू केले असून, कर्णकर्कश हॉर्न, भरधाव वेग, सिग्नलकडे दुर्लक्ष करून सर्रास वाहन दामटवणे असे अनेक प्रकार घडू लागल्याने परिसरातील नागरिक व अन्य वाहनचालक या प्रकारामुळे धास्तावले आहेत.
गंगापूर : गंगापूररोड, कॉलेजरोड भागात चारचाकी व दुचाकी वाहनचालकांनी गेल्या काही दिवसांपासून धुडगूस घालणे सुरू केले असून, कर्णकर्कश हॉर्न, भरधाव वेग, सिग्नलकडे दुर्लक्ष करून सर्रास वाहन दामटवणे असे अनेक प्रकार घडू लागल्याने परिसरातील नागरिक व अन्य वाहनचालक या प्रकारामुळे धास्तावले आहेत. विशेष म्हणजे गंगापूररोड व कॉलेजरोडवर एकूण चार वाहतूक सिग्नल आहेत, मात्र एकाही सिग्नलवर पोलीस नसल्याने वाहनचालकांचे फावते आणि निरपराधाला आपला जीव गमवावा लागत आहे.
नाशिक शहरातील वर्दळीचा रस्ता म्हणून गंगापूररोड, कॉलेजरोडचा उल्लेख केला जात असून, या रस्त्यावर कॉलेज, क्लासेस, व्यावसायिक दुकाने, हॉटेल्सचा सर्वाधिक भरणा आहे. गंगापूर रोडने पुढे धरणावर, वाइनरी प्रकल्पाकडे जाण्यासाठी गंगापूररोड व कॉलेजरोडने चारचाकीने वाहनांना काळ्या काचा लावून वेगाने वाहन चालविण्याचे प्रकार वाढले आहेत. जोरजोरात हॉर्न वाजवून रस्त्यावरील इतर वाहनांना त्रास होईल अशाप्रकारे वाहन चालवून अनेक लहान-मोठे अपघात करून पळून जात यशस्वी झाले, मात्र याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात साधी नोंदही नाही. अनेकांना कायमचे अधू व्हावे लागले आहे. पोलीस मात्र बघ्याची भूमिका निभावताना दिसून येतात.
वाहतुकीची प्रचंड वर्दळ असलेल्या गंगापूररोडवर सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुकानांच्या बाहेर व हॉटेल लॉन्सच्या बाहेर सर्रासपणे चारचाकी वाहने आडव्या तिरप्या उभ्या असतात. विद्या विकास सर्कलपासून ते थेट गंगापूर गावापर्यंत रस्त्यालगत असलेल्या हॉटेलचालक, लॉन्सचालक यांच्या व्यवसायामुळे हा रस्ता वाहतुकीस वा पायी चालणाऱ्यांसाठी धोकादायक झाला आहे.
भरधाव वेगाने वाहन चालवून दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालणाºयांवर पोलिसांनी कारवाई करावी. त्यामुळे गंगापूररोड व कॉलेजरोडवर अपघातांची संख्या कमी होईल. बेशिस्त वाहनचालकांमुळे परिसरात राहणाºया नागरिकांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागते.
- रामभाऊ तेली, स्थानिक रहिवासी